‘सर्वांसाठी घरे’ योजनेत हिंगणघाट पालिका समाविष्ट

By Admin | Updated: May 1, 2016 02:12 IST2016-05-01T02:12:27+5:302016-05-01T02:12:27+5:30

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ या योजनेसाठी राज्यातील २२६ पैकी २५ नगर परिषदांची निवड झाली.

The 'Housing for all' scheme included Hinganghat municipal | ‘सर्वांसाठी घरे’ योजनेत हिंगणघाट पालिका समाविष्ट

‘सर्वांसाठी घरे’ योजनेत हिंगणघाट पालिका समाविष्ट

पत्रकार परिषद : रविवारी होणार योजनेचा शुभारंभ
हिंगणघाट : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे’ या योजनेसाठी राज्यातील २२६ पैकी २५ नगर परिषदांची निवड झाली. यात हिंगणघाट न.प. चा समावेश आहे. या योजनेचा शुभारंभ १ मे रोजी होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी न.प. सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सदर योजना विशेषत: नागरी क्षेत्राकरिता लागू झाली असून राज्यातील सर्व २६ महानगरपालिका तसेच एकूण ३२१ नगर पंचायती व नगर परिषदांपैकी २५ नगर परिषदांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात वर्धा व हिंगणघाट न.प. या योजनेत सहभागी करण्यात आल्या आहेत. सदर योजना ४ घटकांत असून पहिला घटक शासन अधिकृत झोपडपट्टीतील घरासाठी ३२३ चौ. फुटाच्या बांधकामासाठी २ लाख रुपयांच्या अनुदानाची तरतूद केली आहे. दुसऱ्या घटकातील लाभार्थ्यांना ६४४ चौ. फुट चटई क्षेत्रासाठीच्या बांधकामासाठी ६ लाखांपर्यंतच्या कर्जावर ६.५ टक्के व्याज दराने शासन १५ वर्षेपर्यंत व्याज भरणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांना २४ लाखांपर्यंत कर्ज घेण्याची तरतूद आहे; पण ६ लाखांपेक्षा अधिक कर्जाच्या वरची परतफेड लाभार्थ्याला करावी लागणार आहे. तिसरा घटक खासगी विकासाच्या साह्याने ३२३ चौ.फुट बांधकामासाठी २.५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. चवथ्या घटकातील लाभार्थ्यांना त्यांच्या राहत्या जागेवर घराच्या बांधकामासाठी २.५ लाख रुपयांचे अंशदान बांधकामाचे प्रगतीनुसार देण्यात येणार आहे. या गटातील लाभार्थ्यांचे उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावे.
लाभार्थ्यांच्या प्रस्तावाची छाननी व योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम अमरावतीच्या ‘वास्तू क्रिएशन’ या एजन्सीला दिले आहे. यापूर्वी वाल्मिकी आवास योजनेंतर्गत राज्यात ८४ हजार घरकूल झाले. हिंगणघाट पालिकेने ११५० घरकुलांचे बांधकाम केले होते. त्यावेळी २००५ मध्ये नगराध्यक्ष अ‍ॅड. कोठारी होते. अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे सांगत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अ‍ॅड. कोठारी यांनी केले. यावेळी न.प. उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, सभापती गीता मांडवकर, सभापती बादलसिंग रेवते, सभापती सोनाली सुटे, नगरसेवक बळराज अवचट, शंकर मोहमारे, दशरथ ठाकरे, बालाजी गहलोत आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

लागणारी कागदपत्रे व प्रक्रिया
योजनेतील घरासाठी इच्छुकांना घर टॅक्स पावती, जागेचा पट्टा, खसरा, नकाशा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला, घरासमोर उभा असलेला लाभार्थ्याचा फोटो, आधार कार्ड, बँकेचे खाते आदी कागदपत्रे द्यावी लागणार आहे. १ मे पासून न.प. कार्यालयात अर्ज वितरित होणार आहे. ३० मे पर्यंत कागदपत्रांसह सादर अर्जाची छाननी करून लाभार्थ्यांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवून मंजुरीनंतर केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

Web Title: The 'Housing for all' scheme included Hinganghat municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.