घराला आग; कापसासह १७ लाखांचे साहित्य भस्मसात
By Admin | Updated: December 28, 2015 02:28 IST2015-12-28T02:28:01+5:302015-12-28T02:28:01+5:30
नजीकच्या सावली (वाघ) येथील प्रगतशील शेतकरी दिलीप ढोक यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत ...

घराला आग; कापसासह १७ लाखांचे साहित्य भस्मसात
सावली (वाघ) येथील घटना : दोन तासांनी आगीवर नियंत्रण
हिंगणघाट : नजीकच्या सावली (वाघ) येथील प्रगतशील शेतकरी दिलीप ढोक यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील १७ लाखांच्या फर्निचर, साहित्यासह सुमारे ५० क्विंटल कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यावेळी ढोक यांचे संपूर्ण कुटूंब हे नागपूरला होते.
रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास काही ग्रामस्थांना ढोक यांच्या घरातून आगीचे लोळ निघत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संपूर्ण गाव निद्रावस्थेत होता. आगीचे लोळ दिसताच आरडाओरड सुरू झाली. गावात काहीतरी अघटीत घडल्याची चाहूल लागताच गाव जागे झाले. आग विझविण्यासाठी ग्रामस्थ घटनास्थळी धावले. बादली, गुंड तसेच विहिरीवरील मोटरपंप सुरू करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण रौद्ररूप धारण केलेली आग आटोक्यात आली नाही. ५ वाजातच्या सुमारास हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आल्यानंतर आग विझविण्यात आली. घटनेची माहिती नागपूरला ढोक यांना भ्रमणध्वनीवरून देण्यात आल्यानंतर ते गावात दाखल झाले.
या आगीत नव्यानेच बनविलेले घरातील संपूर्ण फर्निचर जळून खाक झाले. दोन टीव्ही, सिलिंग पंखे आदी साहित्य भस्मसात झाले. घरालगतच्या गोदामामध्ये १५० क्विंटल कापूस भरलेला होता. पैकी ५० क्विंटल कापूस जळून खाक झाला. तलाठ्याने घटनास्थळाचा पंचनामा केला. १७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी शॉट सर्कीटमुळे आग लागल्याची शंका व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी)