The house collapsed due to continuous rain | सततच्या पावसामुळे घर कोसळले

सततच्या पावसामुळे घर कोसळले

ठळक मुद्देसंसार उघड्यावर : घरकुलाची प्रतीक्षा; यंत्रणेची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : सततच्या पावसामुळे कुडामातीचे राहते घरही कोसळले. आता आभाळच फाटल्याने कुणी घर देता का घर अशी म्हणण्याची वेळ लालखेड येथील आदिवासी तरुणावर आली आहे.
येथील दिनेश राड्डी व त्याचे कुटुंबीय हलाखीच्या परिस्थितीमुळे मागील अनेक वर्षांपासून कुडामातीच्या मोडक्या घरात वास्तव्याला आहे. आज ना उद्या आपल्याला घरकुल मिळेल या आशेवर असतानाच मागील आठवड्यात झालेल्या पावसाने घराचा अर्धा भाग कोसळून घरावरील छप्परही तुटले. त्यामुळे त्याच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. मागील अनेक वर्षांपासून हा तरुण घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयात येरझारा करीत आहे. मात्र, संबंधित यंत्रणेला पाझर फुटला नाही. लालखेड हे गाव हुसेनपूर गट ग्रामपंचायतीअंतर्गत येत असून या आदिवासीबहुल गावाकडे लोकप्रतिनिधीं व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. येथील ग्रामसेवक हा आठ-आठ दिवस ग्रामपंचायत कार्यालयात येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होऊ शकत नाही. शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नाही. लोकप्रतिनिधी, यंत्रणेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरुणाला घरकुल योजनेचा लाभ तातडीने देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: The house collapsed due to continuous rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.