वेतनाकरिता घंटानाद
By Admin | Updated: November 10, 2015 02:48 IST2015-11-10T02:48:09+5:302015-11-10T02:48:09+5:30
गत १० ते १५ वर्षांपासून विना अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानअभावी पूर्ण वेतनापासून वंचित राहावे लागले आहे.

वेतनाकरिता घंटानाद
जि.प. समोर धरणे : विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचा सहभाग
वर्धा : गत १० ते १५ वर्षांपासून विना अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानअभावी पूर्ण वेतनापासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे त्यांची उपासमार होत आहे. या संदर्भात कृती समितीच्यावतीने वारंवार तीव्र आंदोलन करण्यात आले. परंतु शासनाकडून आश्वासन व्यतिरिक्त काहीही मिळालेले नाही. दिवाळी असतानाही या कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सोमवारी जि.प. समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
सध्या शिक्षण विभागात निघत असलेल्या नवनव्या अद्यादेशामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. केवळ विनाअनुदानित शाळेतील शिक्षकच नाही तर अनुदानित शाळेतील शिक्षकही संभ्रमात आहेत. २८ आॅगस्ट २०१५ चा शासन निर्णय हा मराठी माध्यमांच्या शाळांकरिता अन्यायकारक असून मराठी माध्यमांच्या शाळा मोडकळीस आणणारा असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमांच्या शाळांचे अस्तित्व कायम राहणे, त्यांना बळकटी देणे अत्यंत निकडीचे आहे. शिक्षकांना फक्त अध्यापनाचेच कार्य करू देणे क्रमप्राप्त असताना वारंवार अशैक्षणिक कामात जुंपण्यात येते. त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर पडतो. या बाबी वेळोवेळी शासनाच्यास निदर्शनास आणून दिल्या असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता घंटानाद आंदोलन करण्यात येत असल्याचे कृती समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. आंदोलनात अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचा सहभाग होता.(स्थानिक प्रतिनिधी)