विषयवार तासिका विभागणीत कला, क्रीडा शिक्षकांवर अन्याय
By Admin | Updated: June 1, 2017 00:42 IST2017-06-01T00:42:06+5:302017-06-01T00:42:06+5:30
शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून विषयवार तासिका विभागणी करण्यात येत आहे. या नियोजनानुसार कला

विषयवार तासिका विभागणीत कला, क्रीडा शिक्षकांवर अन्याय
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : परिपत्रक रद्द करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून विषयवार तासिका विभागणी करण्यात येत आहे. या नियोजनानुसार कला व शारीरिक शिक्षण विषयाचा कार्यभार ५० टक्के कमी करण्यात आला आहे. तर कार्यानुभव विषयाचा कार्यभार २५ टक्क्याने कमी केला आहे. ही बाब सदर विषय आणि विषयाच्या शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत आहे. त्यामुळे विषय व तासिका नियोजनाचे परिपत्रक राज्य शासनाने रद्द करावे अशी मागणी होत आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना माजी शिक्षक आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांच्या नेतृत्त्वात देण्यात आले. यावेळी वर्धा जिल्हा कला व क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती, वर्धा जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघ वर्धा, कला अध्यापक संघ यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मूळ अभ्यासक्रमात या विषयांना प्रत्येकी ८ टक्के कार्यभारानुसार प्रत्येक विषयासाठी ४ तासिका देणे आवश्यक आहे. मात्र या नवीन निर्णयाने ५० तासिकेवरून ४५ तासिक केल्याने या तिनही विषयाच्या कार्यभारात अन्यायकारक कपात केली आहे. शाळेत व सेवेत असलेल्या या विषयाच्या शिक्षकांना कोणता कार्यभार द्यावा हा प्रश्न शालेय प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. इतर विषय अध्यापनासाठी या शिक्षकांना दिल्यास शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सेवेतील शिक्षकांवर ही बाब अन्यायकारक ठरत आहे. त्यामुळे या निर्णयाचा विचार होणे गरजेचे आहे.
सन २०१२ मध्ये पुनरचित झालेला प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम अजून इयत्ता आठवीपर्यंत लागू झाला नाही. अशा स्थितीत शालेय वेळापत्रकातील ५० तासिकांमध्ये कपात करून ४५ तासिकांचे नियोजन केले आहे. असे असताना शालेय कामकाजाच्या वेळेत कोणताही बदल झाला नाही. केवळ कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयांच्या तासिका कमी केला. कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण हे विषय शालेय शिक्षणातून हद्दपार करण्याचा घाट शासनाने घातल्याचे दिसते. एकीकडे शिक्षण व आरोग्याचा मूळ पाया म्हणून कला व शारीरिक शिक्षणाकडे पाहिले जाते. कौशल्य शिक्षणाचा मूळ पाया म्हणून कार्यानुभव विषयाकडे पाहिले जाते. या बदलाने हा पायाच कमकुवत ठेवून शिक्षणाची इमारत उभारण्यात शासन यशस्वी होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हसत खेळत शिक्षणाचा मुलमंत्र लक्षात घेवून नवीन शैक्षणिक धोरणाकडे पाहिले जाते. कारण बौद्धिक, मानसिक, भावनिक व शारीरिक विकास या शिक्षणातून साध्य होतो. समाजात नैतिक व सांस्कृतिक मुल्ये रूजविण्याचे काम कला व शारीरिक शिक्षणातून साध्य होते. अशाप्रकारे या विषयांना महत्व देण्याचे धोरण असताना प्रत्यक्षात याच विषयाच्या तासिका कमी केल्या आहे. यामुळे शिक्षणाची उदीष्ट्यांची पूर्तता होवू शकत नाही. पर्यायाने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे. एकीकडे कला व शारीरिक शिक्षण विषयांना अधिक महत्व प्राप्त झाले, तर दुसरीकडे या विषयाच्या तासिका कमी करण्याचा परस्पर विरोधी निर्णय शासन घेत आहे. शासनाने परिपत्रक रद्द करून कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयांना पूर्वीप्रमाणेच तासिक देण्यात याव्या. अन्यथा कला, शारीरिक व कार्यानुभव शिक्षण समन्वय समितीकडून आंदोलनाचा इशारा दिला. निवेदन देताना सुधाकर वाघमारे, रमेश बुटे, दिलीप चव्हाण, सुजाता जोशी, अनंत भाकरे, आशिष पोहाणे, मोहन तवले, नंदिनी बर्वे, पी.के. खोबे आदी उपस्थित होते.