रुग्णालयाचा कारभार आरोग्य केंद्रातूनच
By Admin | Updated: October 29, 2014 22:53 IST2014-10-29T22:53:17+5:302014-10-29T22:53:17+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ आरोग्यसेवा मोफत मिळावी म्हणून शासनाने गाव तेथे दवाखाना धोरण राबविले़ १९८४ मध्ये शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा मिळाल्यावर शासनाने प्राथमिक

रुग्णालयाचा कारभार आरोग्य केंद्रातूनच
बांधकाम अंतिम टप्प्यात : पदभरती अद्याप झालीच नाही; ग्रामीण रुग्णालय केवळ नावापुरतेच
आष्टी (श़) : ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ आरोग्यसेवा मोफत मिळावी म्हणून शासनाने गाव तेथे दवाखाना धोरण राबविले़ १९८४ मध्ये शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा मिळाल्यावर शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा दिला़ लोकसंखा वाढल्याने तब्बल २४ वर्षांनी २००९ मध्ये ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला़ यासाठी ३ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. बांधकामही ८० टक्के पूर्ण झाले; पण शासनाने अद्याप कर्मचारी व अधिकाऱ्यांची पदभरती केली नाही. यामुळे ग्रामीण रुग्णालय नावापुरतेच काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत़
२००९ मध्ये तत्कालीन आमदार अमर काळे यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून ३५ खाटेचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतले. यानंतर नियोजित जागेवरून वाद झाल्याने माजी आमदार दादाराव केचे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवरच ग्रामीण रुग्णालय हवे, अशी मागणी लावून धरली. येथे आजी-माजी आमदारांच्या वादात जनतेची मुस्कटदाबी झाली. शेवटी आ. काळे यांनी जनतेवरच निर्णय सोपवून वादातून माघार घेतली व केचे यांनी त्याच ठिकाणी बांधकाम करायला लावले. सदर जागा आठवडी बाजार, ग्रामपंचायत, शाळा याला लागून असल्याने भविष्यात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत होती़ इमारत बांधकामाचा आगडोंब सोडला तर शासनाने ग्रामीण रुग्णालयाप्रती अनास्थेचे धोरण स्वीकारल्याचेच दिसून आले़
आरोग्य उपसंचालक नागपूर, जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा यांनी वारंवार पत्रव्यवहार करून पदभरती करण्याची मागणी केली़ त्यासाठी बृहत आराखडा मंजूर झाला होता; पण काही ठिकाणी राजकारण आडवे आल्याने ही समस्या आजही कायम आहे़ तालुक्याची लोकसंख्या ५० हजारांच्या वर आहे. एकट्या आष्टी, नवीन आष्टी, पेठअहमदपूर या तीनही गावांची मिळून लोकसंख्या २२ हजार आहे. अशावेळी ग्रामीण रुग्णालय नसणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. रोगराई वाढली आहे. डेंग्यू, गॅस्टोची साथ सतत वाढत आहे. रुग्णतपासणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत़ तालुका आरोगय अधिकारी पदही रिक्त आहे. रुग्णालय म्हटले की केवळ सुसज्ज इमारत असून चालत नाही. त्यासाठी डॉक्टर, परिचारिका, यंत्र, औषधीसाठा असणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शासनाने त्वरित ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदभरती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.(प्रतिनिधी)