रुग्णालयच ‘सलाईन’वर
By Admin | Updated: August 24, 2015 02:04 IST2015-08-24T02:04:00+5:302015-08-24T02:04:00+5:30
स्थानिक ग्रामिण रुग्णालय अनेक समस्यांमुळे सध्या सलाईनवरच आहे. सुसज्ज इमारत, खाटांची सोय असतानाही रुग्णांचे हाल होत आहे.

रुग्णालयच ‘सलाईन’वर
रुग्णांचे हाल : इमारत, खाटा असताना रुग्ण जमिनीवर; औषधीचाही तुटवडा
रूपेश मस्के कारंजा (घा.)
स्थानिक ग्रामिण रुग्णालय अनेक समस्यांमुळे सध्या सलाईनवरच आहे. सुसज्ज इमारत, खाटांची सोय असतानाही रुग्णांचे हाल होत आहे. यामुळे असंतोष पसरला आहे. नागरिकांनी कितीही ओरड केली तरी त्यांच्याकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नसल्याचे दिसते. जिल्हा शल्य चिकित्सकांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
स्थानिक रुग्णालयात औषधींचा तुटवडा, ही नित्याचीच बाब झाली आहे. लिहुन दिलेल्या औषधींपैकी निम्म्या औषधी उपलब्ध नसतात. यामुळे रात्री-अपरात्री रुग्णांना औषधीसाठी भटकावे लागते. अचानक प्रकृती बिघडल्यास नागरिक रुग्णालयात भरती होण्यासाठी जातात; पण तेथे त्यांना भरती करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रुग्ण व नातलग करीत आहेत. रात्री रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसतात. मग, रुग्णांना डॉक्टरचा शोध घ्यावा लागतो. या ग्रामीण रुग्णालयात ट्रामाची इमारतही तयार आहे. येथे केवळ ओपीडी व कर्मचाऱ्यांचे कार्यालय थाटण्यात आले आहे. रुग्ण वाढल्यास या इमारतीचा रुग्णांना भरती करून घेण्याकरिता उपयोग केला जाणे अपेक्षित आहे; पण तसे होत नाही. यामुळे तेथील साहित्य धूळखात पडले आहे. उलट डॉक्टरांना आराम करण्यासाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्याचे दिसते.
सध्या रुग्णालयात नवजात बालके व गरोदर मातांची गर्दी झाली आहे. खाटा उपलब्ध नसल्यास त्यांची जमिनीवर गादी टाकून व्यवस्था केली जाते; पण उपलब्ध इमारत व तेथील खाटांचा वापर केला जात नाही. यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मनोरंजनासाठी उपलब्ध टीव्ही संच बंद पडलेला आहे. वार्डातील पंखेही नादुरूस्त स्थितीत दिसतात. यामुळे ग्रामीण रुग्णालय अनेक समस्यांचे माहेरघरच बनल्याचे दिसते. रुग्ण बरे करणारे रुग्णालयच आजारी व सलाईनवर आहे, असे नागरिक मिश्लिपणे बोलतात. रुग्णांवर तात्पूरते उपचार करून योग्य निर्णय न घेता लहान-सहान आजारावर ‘रेफर’चे औषध दिले जाते.
रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करून शव नातलगांना वेळेत देणे गरजेचे असते; पण तेथेही दिरंगाईच केली जाते. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त असून आरोग्य यंत्रणेने याकडे लक्ष देत सुधारणा करणे अनिवार्य झाले आहे.
खासगी ‘प्रॅक्टीस’ सांभाळून केली जातेय शासकीय नोकरी
ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना वैद्यकीय अधीक्षकांसह जिल्हा शल्य चिकित्सकांचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येते. गत १५ ते २० वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाचा कारभार वैद्यकीय अधिकारी व अधीक्षक पदावर आरूढ होऊन डॉ. शकील अहमद सांभाळत आहेत. ते स्वत:चा खासगी दवाखानाही सांभाळत असल्याचे सांगितले जाते. यामुळेच त्यांना ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचे दिसते.
वैद्यकीय अधीक्षकांचेच रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असेल तर रुग्णांनी तक्रारी कुणाकडे कराव्यात, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे रुग्णांचे हाल होत असून रुग्णालयात अव्यवस्था निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे आहे.