जिल्ह्यात सोयाबीनवर आशा; कपाशीची चिंता मात्र कायम
By Admin | Updated: August 30, 2014 02:02 IST2014-08-30T02:02:46+5:302014-08-30T02:02:46+5:30
ज्या वेळेस सोयाबीनला पाण्याची गरज होती त्याचवेळी पाऊस आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जिल्ह्यात सोयाबीनवर आशा; कपाशीची चिंता मात्र कायम
विजय माहुरे घोराड
ज्या वेळेस सोयाबीनला पाण्याची गरज होती त्याचवेळी पाऊस आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहीतरी उत्पन्न निघेल असे चित्र सध्या जिल्ह्यात निर्माण झाले आहे; मात्र वाढ झाली नसल्याने कपाशी बाबतची चिंता कायमच आहे.
मृग नक्षत्रापासून आश्लेषा नक्षत्रापर्यंत पावसाने दिलेली हुलकावणी साऱ्यांना चिंतेत टाकणारी होती. वेळी अवेळी आलेल्या पावसामुळे नापिकीचे संकट कायम आहे. अशात मध्यंतरी आलेला पाऊस सोयाबीनकरिता संजीवनी देणारा ठरला. सध्या सोयाबीनचे पीक दिलासादायक राहील अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. पण सलग तीन ते चार वर्षांपासून सोयाबीनवर येणारी अळी जरी दिसत नसली तरी हिरव्या, पांढऱ्या व केसाळ अळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे.
सोयाबीनच्या पेरण्या उशिरा झाल्या असल्या तरी अल्पावधीतच हे पीक कन्नोर व फुलावर आले होते. यावेळी लख्ख उन्ह होती, असलेला बहर गळण्याची भीती निर्माण झाली होती. अशातच मघा नक्षत्राची सुरुवात झाली अन् पावसाने हजेरी लावली. पाऊस कमी येत असला तरी तो पिकांना अमृतच ठरला. यामुळे काही का होईना पण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
तालुक्यात गत वर्षीच्या तुलनेत कपाशीचा पेरा जास्त आहे. पावसाच्या दडीमुळे शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून धुळपेरणी व तुषार, ठिंबक सिंचनावर कपाशीची पेरणी केली. रखरखत्या उन्हामुळे कपाशीची वाढ खुंटली, दोन फुली मध्ये असणारे अंतर झाकले नाही. त्यामुळे जमीन तापत होती याचा फटका बऱ्याच प्रमाणात बसला. अर्ध्याअधिक कपाशीच्या पेरण्या मृग नक्षत्रापासून एक महिन्याच्या विलंबाने झाल्या. कोरडवाहू शेतातील कपाशीला सध्या येत असलेल्या पावसामुळे कपाशी वाढण्याला आधार मिळत आहे. सध्या कपाशी पात्यावर व फुलावर आहे. यात कालपरवा आलेला पाऊस या पिकांकरिता संजीवनी ठरू शकातो. पावसाअभावी रासायनिक खताची मात्रा देता आली नव्हती आता खत देण्यायोग्य स्थिती असली तरी पिकात वाढलेले गवत शेतकऱ्यांना चिंतेत पाडणारे आहे.