‘हिरकणी’ कक्ष ठरतोय कुचकामी
By Admin | Updated: December 23, 2014 23:07 IST2014-12-23T23:07:51+5:302014-12-23T23:07:51+5:30
बसस्थानकावर मुलांना स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबना होते. ही बाब हेरून राज्य शासनाच्यावतीने मुख्य बसस्थानकावर ‘हिरकणी’ कक्षाची स्थापना केली. या कक्षात बाळांच्या

‘हिरकणी’ कक्ष ठरतोय कुचकामी
महिला प्रवासी अनभिज्ञ : बसस्थानक आवारातच करतात बाळांना स्तनपान
पराग मगर - वर्धा
बसस्थानकावर मुलांना स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबना होते. ही बाब हेरून राज्य शासनाच्यावतीने मुख्य बसस्थानकावर ‘हिरकणी’ कक्षाची स्थापना केली. या कक्षात बाळांच्या स्तनपानासाठी सुविधा करून दिली. बसस्थानकावर असलेल्या या कक्षाची माहिती मात्र महिलांनाच नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले.
बसस्थानकावर दिवसभर महिला, पुरूष प्रवाशांची गर्दी असते. अशावेळी चिमुकल्यांना स्तनपान करताना महिलांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. भूक लागताच ही चिमुरडी रडायला लागतात, यामुळे नाईलाजाने का होईना सर्वांच्या नजरा वाचवित महिलांना पदराआड मुलांना स्तनपान करावे लागते. अशावेळी आंबटशौकीन चोरट्या जनरेने त्यांच्याकडे बघतही असतात. ही बाब हेरून राज्य शासनाने ही सुविधा केली. कक्ष तयार करताना मात्र त्याबाबत जागृती करण्याचा विसर एसटी महामंडळाला पडल्याचे दिसून येते. बसथानकावर ही सुविधा असताना महिला उघड्यावर स्तनपान करताना दिसून येतात. वर्धा बसस्थानकावर फेरफटका मारला असता अनेक महिला प्रवाशांना बसण्याकरिता असलेल्या बाकांवर मुलांना स्तनपान करीत असल्याचे आढळले. त्यांना हिरकणी कक्षात मुलांना स्तनपान करण्याची सोय आहे, तिथे का जात नाही, असे विचारले असता हिरकणी कक्ष म्हणजे काय? हेच बहुतेक महिलांना माहिती नसल्याचे समोर आले.