हिंगणघाटचा समाधान शिबिर पॅटर्न राज्यात राबवणार

By Admin | Updated: June 12, 2016 01:59 IST2016-06-12T01:59:01+5:302016-06-12T01:59:01+5:30

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात आमदार समीर कुणावार यांनी राबविलेला समाधान शिबिर पॅटर्न आता राज्यभर राबविला जाणार आहे.

Hinganghat to work in camp Pattern | हिंगणघाटचा समाधान शिबिर पॅटर्न राज्यात राबवणार

हिंगणघाटचा समाधान शिबिर पॅटर्न राज्यात राबवणार

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : कुणावारांकडून आमदारांना शिबिराची माहिती
हिंगणघाट : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात आमदार समीर कुणावार यांनी राबविलेला समाधान शिबिर पॅटर्न आता राज्यभर राबविला जाणार आहे. मुंबईतील एका बैठकीत या पॅटर्नची विस्तुत माहिती देण्यासाठी खुद्द आ. समीर कुणावार यांना निमंत्रित करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झालीत. या निमित्त प्रदेश भाजपाच्यावतीने सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विकास पर्व हे महाअभियान राबविले जाणार आहे. या अनुषंगाने भाजप आमदार, खासदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील वसंत विहारमध्ये नुकतीच पार पडली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा पॅटर्न राज्यभर राबविण्याचे निर्देश सर्व आमदारांना दिले. या बैठकीला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होती.
याप्रसंगी आ. समीर कुणावार यांना हिंगणघाट विधानसभा मतदार संघात राबविलेल्या समाधान शिबिराची माहिती देण्याकरिता ३० मिनिटांची वेळ देण्यात आली होती. मंडळनिहाय समाधान शिबिराचे नियोजन, प्रत्यक्ष लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप, महसुल विभागांतर्गत राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ अल्प कालावधीत लाभार्थ्यांना मिळण्याचे नियोजन, विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समन्वय, प्रचार यंत्रणेचे नियोजन, यावरही आ. कुणावार यांनी प्रकाश टाकला. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट, वडनेर, समुद्रपूर, गिरड येथे घेण्यात आलेल्या समाधान शिबिरात ३६ हजार ९८८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्षात लाभ मिळाला.
वडनेर येथील समाधान शिबिराचे खुद्द मुख्यमंत्री साक्षीदार होते. या शिबिराने ते प्रभावित झाले होते. याचवेळी त्यांनी हा पॅटर्न राज्यभर राबविण्याचे संकेत दिले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Hinganghat to work in camp Pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.