हिंगणघाट नगराध्यक्ष पायउतार
By Admin | Updated: November 7, 2015 02:14 IST2015-11-07T02:14:27+5:302015-11-07T02:14:27+5:30
नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालिकेच्या सभागृहात सभा पार पडली.

हिंगणघाट नगराध्यक्ष पायउतार
२५ विरूद्ध एका मताने झाला ठराव पारित
हिंगणघाट : नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता पालिकेच्या सभागृहात सभा पार पडली. २५ विरूद्ध १ मताने प्रस्ताव पारित झाल्याने पंढरीनाथ कापसे यांना नगराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.
सहा नगरसेवकांचे सदस्यत्त्व रद्द झाल्यानंतर पंढरीनाथ कापसे यांची नगराध्यक्षपदाची खुर्ची डळमळीत झाली होती. तेव्हापासूनच त्यांच्यावर अविश्वासाची टांगती तलवार होती. तब्बल २५ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यामुळे कापसे यांचे आसन हलले. या प्रस्तावावर आज पालिका सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सभा बोलाविली होती.
सभेला २७ पैकी २६ नगरसेवक उपस्थित होते. त्यापैकी भाजपा ३, राष्ट्रवादी काँग्रेस ६, काँग्रेस ५, शिवसेना ६, मनसे १ व अपक्ष ४ अशा २५ नगरसेवकांनी अविश्वासाच्या बाजूने तर केवळ अपक्ष नगरसेवक अशोक पराते यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. अशारितीने एकतर्फी प्रस्ताव पारीत झाल्याने कापसे यांना नगराध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले. पंढरीनाथ कापसे या सभेला अनुपस्थित होते. पीठासीन अध्यक्ष उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर होते. मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी सहकार्य केले. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी एसडीपीओ वासूदेव सूर्यवंशी व ठाणेदार मोतीराम बोडखे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त होता.(तालुका प्रतिनिधी) '
२५ नगरसेवकांनी दाखल केला होता प्रस्ताव
पालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ ३३ असताना एक वर्षापूर्वी भाजपाचे पंढरीनाथ कापसे यांना राकाँच्या प्रलय तेलंग, हरिदास काटकर, नीता धोबे, सुरेश मुंजेवार, सूर्यकांता मडावी, शुभांगी डोंगरे नगरसेवकांनी पक्ष विरोधी मतदान केल्याने त्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी अॅड.सुधीर कोठारी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावरून ‘त्या’ सहाही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या जिल्हाधिकारी यांनी निर्णय दिला. या निर्णयाविरोधात या नगरसेवकांनी न्यायालयासह उच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही न्यायालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. यामुळे पालिकेत नगरसेवकांची सदस्य संख्या २७ झाल्याने २१ नगरसेवकांचे संख्याबळ अश्विासासाठी आवश्यक होते. यात २५ नगर सेवकांनी कापसेविरूद्ध अविश्वास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे २८ आॅक्टोबरला दाखल केला होता.