हिंगणघाट पालिकेला ‘अ’ दर्जा प्राप्त
By Admin | Updated: January 15, 2016 02:56 IST2016-01-15T02:56:41+5:302016-01-15T02:56:41+5:30
येथील नगरपालिकेला ‘अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला असून तशी शासनाची अधिसूचना जारी झाली आहे.

हिंगणघाट पालिकेला ‘अ’ दर्जा प्राप्त
शासनाची अधिसूचना जारी : अनुदान वाढीसह नागरी सुविधांत होणार वाढ
हिंगणाट : येथील नगरपालिकेला ‘अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला असून तशी शासनाची अधिसूचना जारी झाली आहे. या पालिकेला पूर्वी ‘ब’ वर्ग होता. पालिका ‘अ’ वर्ग मिळाल्याने येथील नागरिकांना त्या दर्जाच्या सुविधा मिळणार आहे. या पालिकेला मिळणारे अनुदानही याच वर्गानुसार मिळणार असून येथे कर्मचारी संख्येतही वाढ होणार आहे.
हिंगणघाट शहराच्या विकासासाठी १८६७ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून नागरिकांना सेवा पुरविणाया या नगरपालिकेला यापूर्वी ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त होता. ११ जानेवारी २०१६ च्या महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाद्वारे जारी झालेल्या अधिसूचनेनुसार या पालिकेला ‘अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. वाढलेल्या दर्जामुळे पालिकेला मिळणाऱ्या अनुदानात वाढ होण्याची शक्यता असून पालिकेच्या कर्मचारी संख्येतही वाढ होणार आहे. शहरासाठी अधिक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. ब्रिटीश काळातील ही पालिका येत्या वर्षात दिडशे वर्षाची होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
१८६७ मध्ये ही पालिका शासन नियुक्त प्रशासकीय अधिकारी चालवित होते. १९०१ मध्ये पालिका १२ सदस्याची झाली. तेव्हा शहराची लोकसंख्या १२,६२२ एवढीच होती. सन १९१८ मध्ये लोकप्रतिनिधींच्या हाती कार्यभार आला. सन १९८६-८७ मध्ये नगराचे क्षेत्रफळ ६.४८ चौरस किलोमिटर आणि ३९ प्रभाग होते. सध्या हिंगणघाट नगरपालिकेत एकूण ३३ सदस्य (नगरसेवक) आहेत.
‘अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्याच्या निर्णयाचे नगरपालिकेचे अध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी, उपाध्यक्ष निलेश ठोंबरे यांनी नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा देण्यात अग्रेसर राहून शहराच्या विकासासाठी आणखी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.(शहर प्रतिनिधी)