हिंगणघाट बाजार समितीत ४,३४० रुपये दर
By Admin | Updated: December 15, 2015 04:10 IST2015-12-15T04:10:45+5:302015-12-15T04:10:45+5:30
सर्वत्र कापूस उत्पादकांची फसवणूक होत असताना जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळख

हिंगणघाट बाजार समितीत ४,३४० रुपये दर
वर्धा : सर्वत्र कापूस उत्पादकांची फसवणूक होत असताना जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या हिंगणाघाट बाजार समितीत सोमवारी कापसाला ४ हजार ३४० रुपये क्विंटलचा दर देण्यात आला आहे. यामुळे येथे कापसाची आवक वाढल्याचे बोलले जात आहे. हा दर जिल्ह्यातील सर्वाधिक असल्याची माहिती आहे.
कपाशीला शासनाकडून हमीभाव म्हणून ४,१०० रुपये देण्यात येत आहे. बाजारपेठेत आलेला कापूस व्यापाऱ्याकडून या भावातही खरेदी करण्यात येत नसल्याची ओरडही जिल्ह्यात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीपोटी जिल्ह्यात पणन महासंघ व साीसीआची खरेदी केंद्रे सुरू झाली आहे. या केंद्रावर हमीभाव मिळत असताना हिंगणघाट येथे कपाशीला हमीभावापेक्षा अधिक दर देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. येथे हमीभावापेक्षा २०० रुपये अधिक दर देण्यात येत आहे. समितीत मिळत असलेल्या या दरामुळे बाजारपेठेत कापसाची आवक वाढली असल्याची माहिती आहे. या बाजार समितीत जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातूनही कापूस येत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना अत्यंत चांगले भाव मिळत आहे. यापुढेही चांगलेच भाव मिळतील या अनुषंगाने या भाववाढीचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याची आवश्यकता आहे.
- अॅड सुधीर कोठारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट