हिंगणघाट बसस्थानक असुविधेच्या गर्तेत
By Admin | Updated: September 19, 2016 00:48 IST2016-09-19T00:48:37+5:302016-09-19T00:48:37+5:30
प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रिदाने काम करणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांप्रमाणे आता बसस्थानकही समस्यांच्या विळख्यात येत आहे.

हिंगणघाट बसस्थानक असुविधेच्या गर्तेत
देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे नाही : पिण्याच्या पाण्याचीही वानवा
हिंगणघाट : प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रिदाने काम करणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांप्रमाणे आता बसस्थानकही समस्यांच्या विळख्यात येत आहे. येथील बसस्थानकावर प्रवाशांकरिता पुरेशी व्यवस्था नाही, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे परिवहन विभागाने लक्ष देण्याची मागणी आपचे मनोज रूपारेल यांनी परिवहन महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांना निवेदन देवून केली आहे.
महामार्गावरील बसस्थानक म्हणून ओळख असलेल्या येथील बसस्थानकावर सर्वच सुविधा असने अनिवार्य आहे; मात्र येथे तसे नसल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकारामुळे जिल्ह्याची इभ्रत जात असल्याचा आरोप रूपारेल यांनी निवेदनातून केला आहे. हिंगणघाट येथील बसस्थानकावर स्थानकांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून विशेष स्वच्छता होत नसल्याने स्थानकावर कचऱ्याचे ढिग साचल्याचे दिसते. एवढेच नाही तर बसस्थानकावर गुराढोरांचा हैदोस आहे.
या संदर्भात स्थानिक पातळीवर वारंवार निवेदन देवून सुध्दा समस्या सुटल्या नाही. बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. खाजगी वाहनाकडून प्रवाशांची पळवापळवी होते. यात एसटीचे आर्थिक नुकसान होत असताना सुध्दा स्थानिक अधिकारी मुकदर्शक बनले आहेत. बसस्थानक परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय असलेली कुपनलीका बंद पडली आहे. बसस्थानकावरील प्रसाधनगृह व वाहनतळावर भाव फलक नाही. अशा स्थितीत प्रवाशांची आर्थिक लुट होत आहे.
या सर्व बाबीकडे एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून प्रवाशांना चांगली सेवा देण्याची मागणी करण्यात आली आहे. विभागीय नियंत्रकांना निवेदन देताना राजू अरगुडे, प्रमोद जुमडे, शशिकांत गिरी, भगतसिंग पवार, सलमान रंगरेज यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
चोरट्यांचा हैदासे नेहमीचाच
या बसस्थानकावर सणासुदीच्या दिवसात व लग्नसराईच्यावेळी गर्दीचा लाभ घेवून महिलांच्या अंगावरील दागिने, बॅगांची पळवापळवी व पॉकेटमार या बसस्थानकारवर बसूनच असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्याकडून महिलांच्या पळविल्याच्या अनेक तक्रारी पोलिसात दाखल आहेत. शाळा सुटण्याच्या वेळी बसमधील गर्दीच्या लाभ घेवून विद्यार्थिनींची छेड काढणारे अनेक येथे असतात. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांची उपस्थिती व एस.टी. स्थानक परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.