वाहनांच्या गतीमुळे राष्ट्रीय महामार्ग बनलाय ‘मृत्यूमार्ग’
By Admin | Updated: June 15, 2015 02:08 IST2015-06-15T02:08:11+5:302015-06-15T02:08:11+5:30
सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या अमरावती ते नागपूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले.

वाहनांच्या गतीमुळे राष्ट्रीय महामार्ग बनलाय ‘मृत्यूमार्ग’
अनिल रिठे तळेगाव (श्या.पं.)
सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या अमरावती ते नागपूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसह वाहनांचा वेगही वाढला आहे. या अनियंत्रित व गतिमान वाहनांमुळे अपघातांचा आलेखही त्याच वेगाने वर चढत आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही बाब लक्षात येते. राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३२ अपघातांमध्ये २० जणांना प्राणास मुकावे लागले तर ३८ जण जखमी झाले. यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग आता मृत्यूमार्ग बनत चालला आहे.
तळेगाव हे नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वर्धा जिल्ह्यातील चौफुलीचे गाव आहे. याच गावातून आष्टी मार्गाने मध्यप्रदेश हे राज्य जोडले आहे. आर्वी मार्गाने आंध्रप्रदेश (हैद्राबाद) तसेच हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई-कलकत्ता म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून सर्वत्र जाणारी वाहने धावतात. या वाहनांत एसटी बसेस, खासगी प्रवासी ट्रॅव्हल्स, इतर प्रवासी वाहने, ट्रक, ट्रेलर, रेती, गिट्टी, मुरूम व इतर गौण खनिजांची वाहतूक करणारी ओव्हरलोड वाहने अव्याहत धावत असतात. आर्वी-पुलगाव व आष्टी-वरूड या महामार्गाची अक्षरश: वाट लागली आहे. या मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत चालले आहे. हा मार्ग राज्यमार्ग असला तरी त्याची रूंदी तंतोतंत आहे. यामुळे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जड वाहने पायी चालणाऱ्यांना उडविण्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत. रस्त्याच्या कडा भरल्या नसल्याने ट्रक, बस रस्त्याच्या खाली उतरवित नाही. या अपघातांतील अर्धे अपघात सुसाट वेग व मद्यधुंद अवस्थेत वाहने (टू-व्हिलर) चालविल्याने झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. नागपूर-अमरावती मार्गाचे चौपदरीकरण झाल्याने व रस्ता चांगला असल्याने अक्षरश: सर्वच वाहने सुसाट असतात. या वाहनांच्या वेगावर सध्या कुणाचेही नियंत्रण नाही. वाहन चालक वाहतुकीच्या नियंमाचे सर्रास उल्लंघन करतात. महामार्गावर तर ट्रक असो वा कार त्यांचा सुसाट वेग पाहून आश्चर्य व्यक्त केले जाते.
‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ अंतर्गत वाहन चालकांची तपासणी केली जात नाही. आर्वी ते तळेगाव मार्गे आष्टीकडे जाणारे ट्रक व इतर वाहने गाव असून वेग कमी करत नाही. प्रादेशिक परिवहनचे अधिकारी केवळ महसूल गोळा करण्याच्या नावाखाली अधूनमधून वाहने चालान करतात. आष्टी टी-पॉर्इंटवर तर रोडवरच ट्रक उभे असतात. दोन महिन्यांपूर्वी एक ट्रेलर थेट हॉटेलमध्ये घुसला होता; पण जिवीत हानी झाली नव्हती. या महामार्गावर अपघात नित्याचेच झाले आहेत. वाहने अनियंत्रित होऊन उलटण्याच्या घटना दररोज घडतात. यामुळे या मृत्यूमार्गावरील वाहनांचा वेग आवरण्याकरिता कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे झाले आहे.
पोलीस ठाण्यात अपुरा कर्मचारी वर्ग
तळेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३९ गावांचा समावेश असून पोलीस संख्या केवळ १७ आहे. या कर्मचाऱ्यांना ३९ गावांची सुव्यवस्था, राष्ट्रीय महामार्गाने पेट्रोलिंग, खडका बॉर्डर ते सारवाडीपर्यंत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची सुरक्षा, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, अपघात झाल्यास तेथे धाव घेणे या सर्व बाबी पाहाव्या लागतात. यामुळे पोलीस बळ वाढविण्याची वारंवार मागणी होत आहे.