उद्घाटनापूर्वीच महामार्ग भेगाळला; खोदकाम करून नव्याने बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 01:24 PM2021-01-29T13:24:56+5:302021-01-29T13:27:47+5:30

Road Wardha News तळेगाव - आष्टी - साहूर - द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्त्वास गेले. मात्र, उद्घाटन होण्यापूर्वीच रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे आता त्या ठिकाणी खोदकाम करून नव्याने रस्ता तयार करण्याचा खटाटोप चालविला आहे.

The highway merged before the inauguration; New construction by excavation | उद्घाटनापूर्वीच महामार्ग भेगाळला; खोदकाम करून नव्याने बांधकाम

उद्घाटनापूर्वीच महामार्ग भेगाळला; खोदकाम करून नव्याने बांधकाम

googlenewsNext
ठळक मुद्दे१६५ कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह तळेगाव ते द्रुगवाडा राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क   
वर्धा : तळेगाव - आष्टी - साहूर - द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी केंद्र शासनाने १६५ कोटीचा निधी मंजूर केला होता. दोन वर्षामध्ये या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्त्वास गेले. मात्र, उद्घाटन होण्यापूर्वीच रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे आता त्या ठिकाणी खोदकाम करून नव्याने रस्ता तयार करण्याचा खटाटोप चालविला आहे. या महामार्गाचे बांधकाम सदोष असल्याचा हा उत्तम नमुना असून, भविष्यही अधांतरीच दिसत आहे.

राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे रस्त्याचे मातीकाम, मुरमीकरण, मजबुतीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण तसेच ठिकठिकाणी पुलाचे बांधकाम यासह विविध कामे करण्यात आली. कंत्राटदाराच्या या कामांकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे कामाची पुरती वाट लागली आहे. रस्त्याचा मूळ आराखडा बाजुला ठेवून कंत्राटदाराने आपल्या सोयीनुसार काम केल्याचे दिसून येत आहे. देवगाव ते ममदापूर या ठिकाणी दोन किलोमीटरच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. सिमेंट काँक्रीटचा दर्जा न राखल्याने जागोजागी रस्ता भेगाळला आहे. आष्टी शहरातून गेलेला हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय वाईट स्थितीत करून ठेवला आहे. प्राकलन डावलून रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वस्त्या खोलात, तर रस्ता उंचीवर आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी कठडे लावण्यात आल्याने गावामध्ये वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय, अमरावती यांच्याअंतर्गत या महामार्गाचे काम करण्यात आले. काम सुरू असताना अभियंता, उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी लक्षच दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे भविष्य किती? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे याची दखल घेऊन तडा गेलेल्या भागाची तत्काळ दुरुस्ती करावी तसेच तळेगाव, आष्टी, साहूर, द्रुगवाडा, धाडी, ममदापूर या गावातील उपरस्ते खोदून ठेवले असून, त्याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या सदोष बांधकामाबाबत कंत्राटदारांना यापूर्वी दोनदा पत्र दिले आहे. त्यांनी दुरुस्त करून देण्याची हमीपत्र दिले आहे. त्यानुसार काम करून घेण्यात येईल. तडा गेलेल्या भागाची पुन्हा सुधारणा करण्यात येईल. खोदून ठेवलेले उपरस्तेसुद्धा तत्काळ पूर्ण करण्यात येणार आहेत.

एस.आर.रंगारी, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अमरावती.

Web Title: The highway merged before the inauguration; New construction by excavation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.