येथे मिळतो दारूचा प्रत्येक ब्रँड

By Admin | Updated: February 25, 2017 00:42 IST2017-02-25T00:42:35+5:302017-02-25T00:42:35+5:30

दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात खुलेआम दारू मिळते हे काही नवीन नाही. दारूविक्रेत्यांकडून अपवाद वगळता पोलीस हप्ते घेतात ही चर्चाही नवी नाही.

Here every liquor brand is found | येथे मिळतो दारूचा प्रत्येक ब्रँड

येथे मिळतो दारूचा प्रत्येक ब्रँड

महादेवपुऱ्यात कृपादृष्टी कुणाची : तो म्हणतो, पोलीस माझ्या दावणीला
वर्धा : दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात खुलेआम दारू मिळते हे काही नवीन नाही. दारूविक्रेत्यांकडून अपवाद वगळता पोलीस हप्ते घेतात ही चर्चाही नवी नाही. पण महादेवपुरा येथील एक दारू विक्रेता त्याच्याकडे आलेल्या ग्राहकाला थेट पोलीस आपल्या दावणीला असल्याची भाषा बोलत असल्याची माहिती आहे. ‘डरो मत यहा कोई कुछ नही करेगा, पोलीस डरने के लीये नही है.. उनको महिनेका एक लाख पोहोचाता हू, वो क्या कारवाई करेंगे...’ असे म्हणत थेट खाकीची लक्तरे सर्वसामान्यांसमोर टांगतो. हा प्रकार कशामुळे याकडे जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची वेळ आली आहे.
वर्धेत दारूबंदीच्या नावावर दारूचा मोठा व्यवसाय होत आहे. पोलिसांकडून दारूबंदीच्या नावावर गाड्या पकडण्यात येतात. यात वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त होत असल्याचे समोर आले आहे. मग शहरात दारू येते कुठून, हा प्रश्न दारूबंदीच्या ७० वर्षानंतरही अनुत्तरीत आहे. दारूबंदी करण्याकरिता वर्धेत पोलीस विभागाकडून विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. पण हे पथक केवळ शहराच्या बाहेरच कारवाई करीत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून शहरातील दारूविक्रीकडे दुर्लक्ष होते की ते जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करतात, याचा शोध वरिष्ठांनी घेणे गरजेचे आहे. कदाचित यात वरिष्ठांचेही हात गुंतले असल्याने येथे कारवाई करणार कोण असा प्रश्न नागरिकांकडून चर्चीला जात आहे.
महादेवपूरा, शहरातील मध्यवस्तीचा भाग. या भागात एका दारूविक्रेत्याकडून प्रत्येक दारूच्या ब्रँडची विक्री होत आहे. पोलिसांकडून दारूबंदीची कारवाई होत असताना त्याकडे दारूसाठा येतो कुठून, हा एक संशोधनाचा विषय आहे. या दारूविक्रेत्याच्या घरी येणाऱ्या दारूची खबर वर्धेतील ‘कर्तव्यदक्ष’ पोलिसांना मिळत नाही का, मिळत असेल तर कारवाई का होत नाही, असे अनेक प्रश्न या भागातील नागरिक करीत आहेत. वर्धेत केवळ हा एकच दारूविक्रेता नाही. शहरात आणखी ठिकाणीही दारूविक्री होते, पण या दारूविक्रेत्यांकडून होत असलेली मुजोरी नेमकी कशामुळे हे न उलगडणारे कोडे आहे. कदाचित त्याच्यावर काही पोलिसांची कृपादृष्टी तर नाही ना, असा सवाल समोर येत आहे. यातच काही कर्तव्यदक्ष पोलिसांची इभ्रत टांगली जात आहे. पोलिसांनी स्वत: वेळीच आपल्या खाकीच्या धाकाकरिता अशांच्या मुसक्या आवळणे गरजेचे झाले आहे.(प्रतिनिधी)

पोलीस अधीक्षकासह ठाणेदारांना पोहोचवितो पैसा ?
महादेवपुऱ्यातील एका बोळीत दारूविक्री करणारा हा दारूविक्रेता थेट ग्राहकांना आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, ठाणेदार यांना महिन्याकाठी एक लाख रुपये पुरवित असल्याचे बोलतो आहे. यामुळे आपल्यावर कोणी कारवाई करण्याकरिता येत नाही, असे छातीठोकपणे ग्राहकांना सांगत असल्याची माहिती आहे. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


प्रत्येक दारूविक्रेता असे म्हणतो. त्याला काही तथ्य नाही. पोलिसांना याची काळजी नाही. पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्याला काही अपवाद आहे. असो, पण असे म्हणणाऱ्या दारूविक्रेत्याला सोडणार नाही.
- अंकित गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक़

Web Title: Here every liquor brand is found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.