वन्य प्राण्यांचा हैदोस, शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: November 2, 2015 01:42 IST2015-11-02T01:42:39+5:302015-11-02T01:42:39+5:30
सध्या शेतांमध्ये खरीप हंगामातील कपाशी, तुरीचे पीक आहे. काही शेतकरी रबी हंगामाची तयारी करीत आहे.

वन्य प्राण्यांचा हैदोस, शेतकरी त्रस्त
पिकांचे नुकसान : वन विभागाचे दुर्लक्ष
वर्धा : सध्या शेतांमध्ये खरीप हंगामातील कपाशी, तुरीचे पीक आहे. काही शेतकरी रबी हंगामाची तयारी करीत आहे. यातच वन्यप्राण्यांनीही शेतात धुडगूस घालण्यास सुरूवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. वन विभागाकडून शेतकऱ्यांना रानडुक्कर, रोही यांच्या बंदोबस्तासाठी शस्त्र परवाना देण्यास मंजुरी दिली; पण कामे सोडून तेच करायचे काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त झाले आहेत़ वन्यप्राणी शेतात धुडगूस घालत असून पिकांचे नुकसान करीत आहे़ शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांना मारताही येत नाही आणि वन विभाग त्यांचा बंदोबस्तही करीत नाही़ शिवाय वन्य प्राण्यांना मारू नका, असा फतवा वन विभाग काढत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसास वन विभागाचा बेजबाबदार कारभार कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेत शिवारात रानडुक्कर, रोही, माकड व इतर वन्यप्राणी कपाशी, तूर, ऊस व अन्य पिकांचे नुकसान करीत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार शेतकरी करतात; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते़ वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना शस्त्र परवाना देण्याची बाब वन विभागाने मान्य केली; पण शेतकरी शेतातील कामे सोडून शस्त्र घेऊन प्राण्यांना मारण्याचे काम करणार काय, हाही प्रश्नच आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)