थकीत कर्जामुळे शेतकरी हवालदिल
By Admin | Updated: May 21, 2015 02:06 IST2015-05-21T02:06:48+5:302015-05-21T02:06:48+5:30
मागील खरीप हंगामात अतिवृष्टी व विलंबाने आलेला पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

थकीत कर्जामुळे शेतकरी हवालदिल
पिंपळखुटा : मागील खरीप हंगामात अतिवृष्टी व विलंबाने आलेला पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उत्पादनात घट झाल्याने शेतकरी भीषण दुष्काळाच्या संकटात सापडला. शेतीसाठी घेतलेले कर्जही फेडता आले नाही. आता पुन्हा खरीप हंगाम तोंडावर असल्याने कर्ज वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे दिसते.
विलंबाने आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. शिवाय अवेळी आलेल्या पावसाने प्रत गेली व बाजारभाव कमी झाला. तुरीचे पीकही कमी पावसामुळे अधिक उत्पन्न देऊ शकले नाही. कापसाच्या पिकावर जंगली श्वापदांसह विविध रोगांचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात दुष्काळाची निराशाच पडली. शेतीकरिता बँकेकडून कर्ज घेतले; पण ते अदा करता आले नाही. यामुळे डोईवर कर्जाचा डोंगर उभा झाला. नवीन कर्ज कसे मिळणार, पुढील वर्षाची पेरणी कशी करावी, प्रपंच कसा करावा, मुला-मुलींचे शिक्षण, लग्नप्रसंग, आजारपण आदी जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात, या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. शेतीला अधिक खर्च आला आणि उत्पादन अत्यल्प झाले. कापूसही मातीमोल भावाने विकावा लागला. अतिवृष्टी व दुष्काळापोटी शासनाने मदत दिली; पण ती अत्यल्पच होती. यामुळे या खरीपासाठी खते, कीटकनाशके, बियाणे कसे खरेदी करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे हतबल शेतकरी येत्या हंगामातही शेतीसाठी उभा राहणार असून कामे सुरू झाली आहेत.(वार्ताहर)