नरबळी प्रकरणातील आरोपीच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी
By Admin | Updated: May 7, 2015 01:28 IST2015-05-07T01:28:31+5:302015-05-07T01:28:31+5:30
रूपेश मुळे नरबळी प्रकरणातील आरोपी मुन्ना उर्फ आसिफ पठाण याने न्यायालयात जमानतीसाठी अर्ज केला आहे.

नरबळी प्रकरणातील आरोपीच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी
वर्धा : रूपेश मुळे नरबळी प्रकरणातील आरोपी मुन्ना उर्फ आसिफ पठाण याने न्यायालयात जमानतीसाठी अर्ज केला आहे. या अर्जावर गुरूवारी सुनावणी होणार असल्याने सर्वांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.
८ नोव्हेंबर २०१४ रोजी मुन्ना उर्फ आसिफ पठाण या नराधमाने रूपेश मुळे या चिमुकल्याचा नरबळी घेतला. या घटनेने समाजमन सुन्न झाले. सर्वांच्या सहकार्याने तपासाला गती मिळाल्याने आरोपी पोलिसांना गवसला. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी सर्व स्तरातून होत असताना घटनेतील आरोपी आसिफ पठाण याने जमानतीसाठी न्यायालयात एका वकिलाकरवी कोर्टात अर्ज सादर केला आहे.
या निर्णयावर यापूर्वी ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार होती; पण ती पुढे ढकलण्यात आली होती़ आता गुरूवारी ७ मे रोजी सुनावणी होणार आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत असताना पठाण याने जमानतीसाठी अर्ज सादर केल्याने सर्वत्र आश्चर्य तसेच चीड व संताप व्यक्त होत आहे. यावर गुरूवारी न्यायालय काय निकाल देणार, याकडे संपूर्ण वर्धेकरांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)