आरोग्य कर्मचारी वेतनापासून वंचित
By Admin | Updated: March 18, 2015 01:58 IST2015-03-18T01:58:12+5:302015-03-18T01:58:12+5:30
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत़ शिवाय दोन महिन्यांपासून वेतनही देण्यात आलेले नाही़ यामुळे त्यांच्या कुटुंबांची आर्थिक ओढताण होत आहे़ ...

आरोग्य कर्मचारी वेतनापासून वंचित
वर्धा : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत़ शिवाय दोन महिन्यांपासून वेतनही देण्यात आलेले नाही़ यामुळे त्यांच्या कुटुंबांची आर्थिक ओढताण होत आहे़ पद भरतीचा घोळ कायम असून मंजूर पदेही भरली जात नाहीत़ या प्रकारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत अनेकदा प्रशासनाशी चर्चा करण्यात आली़ त्यावेळी समस्या सोडविण्याची ग्वाही देण्यात आली होती; पण अद्यापही कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे़
आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित आहे़ ते दरमहा नियोजित तारखेस करण्यात यावे़ जानेवारी व फेब्रुवारीचे वेतन अद्याप देण्यात आलेले नाही़ आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेकडून करण्यात यावे़ आकृतीबंधानुसार आरोग्य पर्यवेक्षक पदे निश्चित करून भरणे गरजेचे आहे़ शासन निर्णयानुसार १९ पदे मंजूर आहेत़ आरोग्य सेवक (पुरुष) ही पदे निश्चित करून भरणे गरजेचे होते़ याबाबत शासनाने २००३ व २००७ च्या सुधारित आकृतीबंधाने उपकेंद्रातील १८० पदे, तालुक्यातील ८ पदे व जिल्हा मुख्यालयातील २ पदे अशी एकूण १९० पदे तर २२११ लेखाशिर्षमधील लसटोचक ५ पदे मंजूर केली आहे़ आकृतीबंधानुसार आरोग्य सहायक (पुरुष) ही पदेही निश्चित करून भरण्यात आली नाहीत़ याबाबत शासनाने ६६ पदे मंजूर केली आहेत़ आरोग्य सहाय्यक (महिला) ही पदेही भरली नाहीत़ यातील एकूण ५७ पदे मंजूर आहेत़ आरोग्य सहायक (महिला) ही २१६ पदे मंजूर आहेत़ या कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे़
आरोग्य सेविका, सेवक, आरोग्य सहायक, सहायिका यांना १२ व २४ वर्षांच्या आश्वसित प्रगती योजनेनुसार लाभ देण्याची मागणी आहे़ पदोन्नतीमधील ग्रेड पे मध्ये घोळ आहे़ तो करून थकबाकी देण्याची मागणी प्रलंबित आहे़ आकृतीबंधानुसार मंजूर असलेली पं़स़ कार्यालयातील आरोग्य सेवक ही मंजूर पदे भरण्यात आलेली नाहीत़ आरोग्य सेविकांना सुधारित दराने गणवेश व धुलाई भत्ता देण्याकरिता शासनाकडे पाठपुरवा करावा, आरोग्य पर्यवेक्षक पदावर आरोग्य सहायक संवर्गातून पदोन्नतीने पदे भरली जावीत, आरोग्य सहायक पुरुष पदावर आरोग्य सेवकांना पदोन्नती देण्यात यावी, आरोग्य सहायिका पदावर आरोग्यसेविकांना पदोन्नती देण्यात यावी, कुटुंब कल्याण, व पटकी प्रतिबंधक योजनेतील मंजूर पदे भरावी, सर्व आरोग्य कर्मचारी संवर्गातील बिंदु नामावली व ज्येष्ठता यादीतील तफावत दूर करावी, आदी मागण्या प्रलंबित आहेत़ या समस्या त्वरित सोडवाव्या, अशी मागणी जि़प़ आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)