Health check-up by interacting with 92,000 people | ९२ हजार व्यक्तींशी संवाद साधून आरोग्य तपासणी

९२ हजार व्यक्तींशी संवाद साधून आरोग्य तपासणी

ठळक मुद्दे‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम : ६०३ विशेष पथकांकडून २५ हजार ४१५ गृहभेटी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासह त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची काळजी कशा प्रकारे घ्यावी, हे पटवून देण्यासाठी राज्य शासनाने १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ हे जनजागृती अभियान दोन टप्प्यात राबविण्याचे निश्चित केले आहे. याच विशेष मोहिमेच्या माध्यमातून २५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ९२ हजार व्यक्तींशी संवाद साधून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
अभियानांतर्गत शहर व गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या पथकामार्फत गृहभेटी देऊन सर्वेक्षण करीत आहे. १५ सप्टेंबर पासून राबविण्यात येत असलेल्या अभियानादरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ६०३ पथकामार्फत २५ हजार ४१५ गृहभेटी देऊन ९२ हजार ६९० व्यक्तींसोबत संवाद साधून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान १२४ व्यक्तींना सर्दी, तापची लक्षणे आढल्याचे निष्पन्न झाले. तसेच ऑक्सिजनची पातळी ९५ टक्केच्या कमी असलेली २५ व्यक्ती आढळून आली. या व्यक्तींना रुग्णालयात उपचार घेण्यास कळविण्यात आले आहे. गृहभेटी दरम्यान भेट दिलेल्या घरांना स्टिकर लावण्यात येत आहेत. घरातील प्रत्येक व्यक्तींना वेळीच आरोग्य तपासणी करण्यासह कोरोना काळात कसे रहावे याची माहिती दिली जात आहे. प्रत्येक व्यक्तीची तापमानाची नोंद करण्यात येत आहे. घरातील सदस्यांना कर्करोग, अस्थमा, मधूमेह, किडनी यासारखे अतिजोखमीचे आजार असल्यास त्याची नोंद घेण्यात येत आहे. तसेच मास्क लावणे, वारंवार साबनाने हाथ धुणे, नाक, तोंड व डोळे यांना वारंवार हात लावू नये, गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळावे इत्यादी माहिती दिली जात आहे.

Web Title: Health check-up by interacting with 92,000 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.