मुख्यालयी निवासास कर्मचाऱ्यांची बगल
By Admin | Updated: September 21, 2014 23:56 IST2014-09-21T23:56:06+5:302014-09-21T23:56:06+5:30
महावितरणच्या येथील कर्मचाऱ्यांना सध्या मुख्यालयी न राहण्याचा आजार जडल्याचे चित्र आहे़ कनिष्ठ अभियंता आणि लाईनमनही मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना

मुख्यालयी निवासास कर्मचाऱ्यांची बगल
गिरड : महावितरणच्या येथील कर्मचाऱ्यांना सध्या मुख्यालयी न राहण्याचा आजार जडल्याचे चित्र आहे़ कनिष्ठ अभियंता आणि लाईनमनही मुख्यालयी राहत नसल्याने गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे़ या प्रकारामुळे गावातील विजेच्या समस्यांमध्येही वाढ झाली आहे़ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे़
महावितरणचे कर्मचारी मुख्यालयी का राहत नाहीत, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत़ सध्या पावसाळा असल्याने गावातील विजेच्या समस्यांचा प्राधान्याने निपटारा करणे अनिवार्य आहे़ यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे गरजेचे असते; पण येथील कर्मचारी मुख्यालयी उपस्थित नसतात़ यामुळे तक्रारी कुणाकडे कराव्यात, असा प्रश्न सामान्यांना भेडसावतो़
रोहीत्रावरून वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थांना रात्रभर अंधारात राहावे लागते़ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाची वीज नेहमीच एक फेज गायब असल्याने बंद असते; पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दुरूस्ती करण्यास वेळ नसल्याचे दिसते़ लाईनमनला फोन केला तर उत्तर मिळत नाही. कार्यालयात गेल्यास अधिकारीही मिळत नाहीत़ मग, दाद कुणाकडे मागावी, असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत़
वीज दुरूस्तीची सर्व साधने कर्मचाऱ्यांना देण्यात आली असली तरी आता होणार नाही, असे सांगितले जाते़ पावसाळ्यात विजेचा हमखास त्रास सहन करावा लागतो़ संततधार पाऊस असला तर पाऊस थांबेपर्यंत अंधारात राहावे लागते. महावितरणचे कर्मचारी नागरिकांना असभ्य वागणूक देतात व उडवाउडवीची उत्तरे देतात. गावातील नागरिक वा शेतकरी यांनी तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो़ शेतकरी, ग्राहकांना वीज त्वरित दुरूस्त करून घ्यायची असल्यास तालुका अभियंता वा उपअभियंत्यांशी संपर्क करावा लागतो़ यानंतरच ग्राहकांना न्याय मिळतो़ अन्यथा खासगी लाईनमन शोधून दुरुस्ती करून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो़
रात्रीला महावितरणचा लाईनमन गावात राहावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे; पण याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचेच दिसते़ या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या समस्यांत वाढ होत आहे़ खंडित झालेली वीज रात्रभर येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत गिरड ३३ केव्ही अंतर्गत कनिष्ठ अभियंता व सर्व लाईनमनला मुख्यालयी राहण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे़(वार्ताहर)