मुख्याध्यापक जबाबदारीतून मुक्त; पण मदत कायमच
By Admin | Updated: August 5, 2014 23:50 IST2014-08-05T23:50:50+5:302014-08-05T23:50:50+5:30
शालेय पोषण आहार मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांसाठी संकट ठरले होते; पण शासन आदेशानुसार ही जबाबदारी बचत गटांवर सोपविण्यात आली़ यामुळे मुख्याध्यापक या जबाबदारीतून मुक्त झाले;

मुख्याध्यापक जबाबदारीतून मुक्त; पण मदत कायमच
सेवाग्राम : शालेय पोषण आहार मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांसाठी संकट ठरले होते; पण शासन आदेशानुसार ही जबाबदारी बचत गटांवर सोपविण्यात आली़ यामुळे मुख्याध्यापक या जबाबदारीतून मुक्त झाले; पण काही ठिकाणी बचत गट शालेय पोषण आहाराचे काम करण्यास तयार नसल्याने स्वयंपाकी महिलांसह मुख्याध्यापकांवरच नाईलाजास्तव जबाबदारी आल्याचे दिसून येते़
शालेय विद्यार्थ्यांचे वय, शाळेच्या तासांचा कालावधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शाळेतच पोषण आहार मिळावा, या उदात्त हेतूने ही योजना शासनाने सुरू केली. याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकावर असल्याने एक ना अनेक भानगडी निर्माण झाल्या़ ही योजना राबविताना अनेक कसरती कराव्या लागल्या. दोषांचे खापरही फुटू लागले. मुख्याध्यापक संघटनांनी यास विरोध दर्शविला़ यामुळे शालेय पोषण आहार बचत गटांना सुपूर्द करण्याचा मार्ग काढण्यात आला़ यामुळे मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकांना सुटलो एकदाचे! असे झाले; पण काही ठिकाणी बचत गटांनी आहाराचे कामच स्वीकारले नाही़ यामुळे आता कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ शेवटी आपलेपणाच्या भावनेतून स्वयंपाकी महिलांच्या मदतीने आहार योजनेचे काम सुरू ठेवावे लागले. शाळेचे प्रमुख म्हणून मुख्याध्यापकावर जबाबदारी आहे़ या योजनेवर त्यांचे लक्ष व नियंत्रण आहे; पण त्यांना शाळेतील सर्व शिक्षक मदत करतील़ जेणेकरून कामाचा ताण वाढणार नाही, तशी कामांची विभागणी सुचविण्यात आली आहे. आहारातून कोणताही विषबाधा वा इतर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकास जबाबदार धरले जाणार नाही तर बचतगट व स्वयंपाकी महिलांना जबाबदार धरून चौकशी करण्यात येणार आहे. यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकही मदतीस तयार झालेत़ योजनेच्या मालाची तपाणी, नोंदी, साठा, मागणी आदी कामे जिकरीची असल्याने नको ही योजना, अशीच भूमिका बचत गटांनी घेऊन त्याकडे पाठ फिरविल्याचे दिसते़(वार्ताहर)