पोहण्याकरिता उतरलेला इसम बेपत्ता
By Admin | Updated: May 31, 2016 01:55 IST2016-05-31T01:55:42+5:302016-05-31T01:55:42+5:30
येथील ठाकूरदास पोद्दार यांच्या शिवबाग मंदिर परिसरातील तलावात चंदु सूर्यभान तडस याने पोहण्याकरिता उडी

पोहण्याकरिता उतरलेला इसम बेपत्ता
हिंगणघाट : येथील ठाकूरदास पोद्दार यांच्या शिवबाग मंदिर परिसरातील तलावात चंदु सूर्यभान तडस याने पोहण्याकरिता उडी मारली. या घटनेला ३६ तास लोटूनही तो अद्याप बेपत्ताच आहे. याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्याला शोधण्याची मोहीम राबविण्याची मागणी आहे. त्याचा या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, शास्त्री वॉर्डातील चंदु सूर्यभान तडस (४८) हा पोहण्यासाठी शिवबाग तलावावर गेला होता. रविवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान त्याने तलावात उडी मारली; परंतु नंतर तो पाण्याबाहेर आला नाही. ही बाब त्यावेळी उपस्थित काही युवकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार निलोत्पल यांनी घटनास्थळ गाठून भोई समाजाच्या काही लोकांकडून शोध घेतला. परंतु चंदु तडस गवसला नाही. रविवारी सुद्धा पोलिसांनी काही लोकांच्या माध्यमातून शोध घेतला तरीही त्याचा थांगपत्ता लागला नाही. या संदर्भात तहसीलदार दीपक करंडे यांनाही सूचना देण्यात आली. नगराध्यक्ष अॅड. सुधीर कोठारी यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. परंतु अद्याप ठोस उपाय योजना करण्यात आली नाही. बेपत्ता चंदु तडस याचा शोध घेण्याची मागणी प्रकाश राऊत, मनोज रूपारेल, गजु कुबडे, तेजस तडस आदी सह नागरिकांनी केली आहे. ठाणेदार निलोत्पल जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आहेत.(तालुका प्रतिनिधी)