सुगंधाची पखरण करीत तो वेचतो संसार
By Admin | Updated: January 17, 2015 23:03 IST2015-01-17T23:03:56+5:302015-01-17T23:03:56+5:30
जन्मत:च एक हात आणि एका पायाने तो अपंग. त्यामुळे बालपण सर्वांच्या उपेक्षा झेलण्यात आणि कीव करणातच गेलं. लोकांना दया वाटायची. त्याला मात्र हा प्रकार मुळातच आवडत नव्हता.

सुगंधाची पखरण करीत तो वेचतो संसार
गौरव देशमुख -वायगाव (निपाणी)
जन्मत:च एक हात आणि एका पायाने तो अपंग. त्यामुळे बालपण सर्वांच्या उपेक्षा झेलण्यात आणि कीव करणातच गेलं. लोकांना दया वाटायची. त्याला मात्र हा प्रकार मुळातच आवडत नव्हता. आपण नक्की काही तरी चांगलं करायच यावर ठाम विश्वास ठेवत त्याने अवघ्या दहाव्या वर्षापासून रस्तोरस्ती फिरत अगरबत्ती विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आज याच व्यवसायाच्या जोरावर धर्मराज महादेव वाघमारे हे इतरांच्या आयुष्यात सुगंधाची पखरण करीत आहे.
अपंग असतानाही स्वत:च्या जिद्दीवर धर्मराजने अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करीत ग्रंथपालाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर नोकरीसाठी कित्येक ठिकाणी जोडे झिजवले. पण पदरी निराशाच पडली. त्यामुळे नोकरीला रामराम ठोकत हक्काचा पुन्हा अगरबत्ती विक्रीचाच व्यवसाय सुरू करीत त्यातच यशस्वी होण्याचा चंग बांधला. मुळातच मनमिळावू स्वभाव असल्याने हा व्यवसाय करताना आलेल्या अडचणींवर मात करणे धर्मराजला सहज शक्य झाले. आज ते सांगतात की सुरुवातीला माणसं कीव करायची. मला मात्र हा प्रकार आवडत नव्हता. देवळी, कानगाव, अल्लीपूर, वर्धा, वायगाव या परिसरात जाऊन घरोघरी, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालयात अगरबत्तीची विक्री करणे साधे नव्हते. सुरुवातीला बराच त्रास झाला. पण आपण इतरांच्या जीवनात सुगंध पसरवीत असल्याचं आत्मिक समाधान या व्यवसायानं दिल्याच धर्मदास सांगतात.