बेशरममध्ये हरवले धाम नदीचे पात्र
By Admin | Updated: February 28, 2017 01:13 IST2017-02-28T01:13:18+5:302017-02-28T01:13:18+5:30
वर्धा शहरासह अनेक गावांना पिण्याचे पाणी पूरविणारी धाम नदी सध्या अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडली आहे.

बेशरममध्ये हरवले धाम नदीचे पात्र
पाणी होतेय दूषित : पाटबंधारे विभाग, जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायतीचेही दुर्लक्षच
मोईन शेख आंजी (मोठी)
वर्धा शहरासह अनेक गावांना पिण्याचे पाणी पूरविणारी धाम नदी सध्या अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडली आहे. नदी पात्रात सर्वत्र बेशरम वाढली असून शेवाळ साचले आहे. परिणामी, पाणी दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे लक्ष देत धाम नदीचे पात्र स्वच्छ करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
आंजी येथून वाहणारी धाम नदी बेशरम व इतर झुडपांनी हरविल्याचे चित्र आहे. बेशरम वाढल्याने तथा झुडपांमुळे नदीचे पात्रच दिसेनासे झाले आहे. धाम नदी महाकाळी प्रकल्पातून वाहत असून वणा नदीला जाऊन मिळते. या नदीचे पात्र सर्वत्रच बेशरम व झुडपांनी पूर्णत: बुजलेले दिसून येते. यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि दिशाच बददल्याचे दिसून येते. महाकाळी प्रकल्पापासून येळाकेळीपर्यंत ही नदीच मुख्य कालवा म्हणून कार्य करते. त्यामुळे नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १९८५ पासून महाकाळी प्रकल्प कार्यान्वित झाला आहे; पण अद्याप एकदाही नदीचे पात्र साफ करण्यात आलेले नाही. यामुळे नदीने आपल्या प्रवाहाचा मार्ग बदलल्याचे दिसून येते. परिणामी, नदी पात्र सरळीकरण आणि स्वच्छतेची मागणी ग्रामस्थांतून होत आहे; पण ग्रा.पं. प्रशासनला हे काम परवडण्यासारखे नसल्याने कधी कुणी पुढाकार घेतल्याचे ऐकिवात नाही.
महाकाळी प्रकल्पापासून काचनूर, मोरांगणा, खरांगणा, कामठी, सेवा, खैरी, आंजी, सुकळी, येळाकेळीपर्यंत नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात बेशरम आणि विविध वनस्पतींच्या झुडपांनी हरविल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात नदीला पूर येते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत असल्याने नदीचे पाणी गावात शिरते. परिणामी, पुरामुळे गावाला धोका निर्माण झाला आहे.
महाकाळी ते येळाकेळीपर्यंत ही नदी कालव्याचे काम करीत असल्याने पाटबंधारे विभागाने पात्राची स्वच्छता करणे गरजेचे आहे; पण हा विभाग नदीच्या पात्राकडे कधीही लक्ष देताना दिसत नाही. ग्रामपंचायत प्रशासन नदीच्या स्वच्छतेकरिता मोठ्या प्रमाणात निधी खर्च करू शकत नाही आणि जिल्हा प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नदीच्या काठावरील गावांना धोका निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पाणी पुरवठा योजनांनाही धोकाच
धाम नदीवर वर्धा शहरासह अनेक गावांतील पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. या योजनांच्या परिसरातही अनेक ठिकाणी बेशरमची झाडे तथा झुडपेही वाढली आहे. नदी पात्रामध्ये अनेक ठिकाणी शेवाळ साचले आहे. यामुळे पाणी अवरुद्ध होत आहे. परिणामी, पाणी पुरवठ्याच्या यंत्रणांमध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या नदीवरून जीवन प्राधिकरण, नगर परिषद वर्धा तथा अन्य गावांना पाणी पुरवठा केला जातो. यामुळे ही नदी स्वच्छ करीत योजनांचा भविष्यातील धोका टाळणे गरजेचे झाले आहे.