भाजीपाल्याचे दर कडाडल्याने गृहिणींचे बजेट गडगडले
By Admin | Updated: April 16, 2016 01:33 IST2016-04-16T01:33:06+5:302016-04-16T01:33:06+5:30
उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटत असल्याने होणारी दरवाढ ही बाब नेहमीचीच झाली आहे.

भाजीपाल्याचे दर कडाडल्याने गृहिणींचे बजेट गडगडले
सर्वसामान्यांना महागाईचे चटके : आंब्याचे भावही भिडले गगनाला
वर्धा : उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटत असल्याने होणारी दरवाढ ही बाब नेहमीचीच झाली आहे. गतकाही वर्षांपासून भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढल्याने उन्हाळ्यात मंदावणारी आवक आता वाढली असल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते. असे असले तरी टमाटर आणि कांदे वगळता अन्य भाज्यांचे दर किलो मागे सर्वसाधारण १० रुपयांनी वधारल्याचे दिसून येत आहे. यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला भाजी घेताना चांगलीच कात्री लागेल, असे चित्र आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात आंब्याची चव चाखणेही महागातच पडेल, असे दिसून येत आहे. आंब्याची आवक सुरू झाली आहे. प्रारंभी आंब्याचे दर १०० ते १५० रुपये प्रतिकिलो आहेत. शिवाय पन्हे, सरबत आणि लोणच्यासाठी असलेल्या कच्चे आंबे ८० रुपये प्रतिकिलो आहे. भेंडी, चवळी, गवार यांचे दर वधारलेलेच दिसून येतात. यामुळे बाजारात गेल्यानंतर कोणती भाजी विकत घ्यावी, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडत असल्याचे दिसते. वांगे, पालक या भाज्यांचे दर सध्या स्थिर असल्याने अधिक मागणी असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली.
जिल्ह्यात शेडनेट, मल्चिंग शेतीच्या माध्यमातून फळ, भाज्या व पालेभाज्यांची पिके घेतली जातात. या पिकाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने अन्य जिल्ह्यातून भाजीपाल्याची होणारी आयातही कमी झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांकडून मुबलक साठा उपलब्ध होत असल्याचे घाऊक व्यापाऱ्याने सांगितले; पण मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसामुळे व वादळाने भाजीपाला पिकांना चांगलाच फटका बसला. परिणामी, दरवाढ झाल्याचे सांगण्यात येते. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडत असल्याचे दिसते.(स्थानिक प्रतिनिधी)
फळांचे भावही वधारले
उन्हाळ्यात रसाळ फळांची विशेष मागणी असते. यात द्राक्ष, तरबुज, डांगर, डाळींब यांची अधिक विक्री होते. दरवर्षी द्राक्षाचे भाव ४० ते ८० रुपयांपर्यंत असतात; पण यंदा या भावात वाढ झाल्याचे दिसते. बाजारात ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे द्राक्ष आहेत. द्राक्षात तीन प्रकार असून कॅप्सूल आणि काळ्या द्राक्षांचे भाव अधिकच आहेत. शिवाय आंब्याचे दर प्रारंभीपासूनच अधिक असल्याने यंदा आंबा आणखी महागणार, असे चित्र आहे. सध्या बाजारपेठेत आंब्याची आवक मर्यादित आहे. मे महिन्यापर्यंत आवक वाढल्यास भाव कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली. बैगणपल्ली, बदाम या आंब्यांचे भाव सध्या १०० ते १५० रुपये किलो आहेत.