दिवाळीत व्हॉटस्अॅपचा सर्वाधिक वापर : स्वस्तात व लवकर पोहोचतात मॅसेजवर्धा : दिवाळी हा भारतीयांसाठी लाखमोलाचा सण आहे. श्रीमंत, गरीब प्रत्येकच आपल्या परीने दिवाळी साजरी करतो. तरुणांसाठी हा सण आनंदाचा वर्षाव करणारा असतो. तो इतरांसोबत शेंअर करण्यासाठी आधी मोठ्या प्रमाणात छापील शुभेच्छापत्रांचा उपयोग होत आहे. पण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियातील नवनवीन माध्यमांमुळे ही शुभेच्छापत्रे इतिहासजमा होत आहेत. इंटरनेटने मोबाईल आणि संगणक सोशल मीडियाला जोडल्या गेल्याने आॅनलाईन शुभेच्छापत्रांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे छापील शुभेच्छापत्रांची मागणी कमालीची मंदावली आहे. त्यातच व्हॉट्स अॅप, फेसबूक आदी माध्यमांतून स्वस्तात व काही क्षणात व्हर्चुअल ग्रिटिंग कार्ड कुणालाही पाठविता येते. पूर्वी सणानिमित्त विविधांगी शुभेच्छापत्रांची खरेदी करून ती आप्तस्वकीय, मित्र-मैत्रिणींना पाठविण्यात येत होती. दिवाळीला तर शुभेच्छापत्रांच्या दुकानात ग्राहकांची कमालीची गर्दी असायची. आता मोबाईलच्या वापरामुळे, आगमनामुळे शुभेच्छापत्रांची क्रेझ कमी होताना दिसत आहे. नक्षीदार व कलाकुसरीने तयार शुभेच्छापत्रांचे युवकांमधील आकर्षण दिवसेंदिवस कमी होत आहे. केवळ व्हॅलेंटाइन डे लाच शुभेच्छापत्रांचा खप मोठ्या प्रमाणात होतो. सोशल मीडियाद्वारे सहज व तात्काळ संदेश पाठविता येतात. त्यामुळे सर्वांचीच सोशल मीडियातील माध्यमांना पसंती मिळत आहे. आहे. इंटरनेट पॅक मारून जास्त जणांना दिवाळीच्या शुभेच्छा देता येतात.फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर तर दररोज अॅडव्हान्स शुभेच्छांचा वर्षाव होतो. इंटरनेट पॅक मारल्यानंतर एसएमएसचे दर लागत नसल्याने शुभेच्छांचा वर्षाव पहावयास मिळतो. शुभेच्छांची डिझाईन मोबाईलवर तयार करून किंवा इंटरनेटवरील शुभेच्छापत्र डाऊनलोड करून युवक-युवती ते फेसबुकवर अपलोड करतात. या कारणाने छापील शुभेच्छापत्रांना घरघर लागली असून ही दुकाने भर दिवाळीत खाली दिसत आहे. पूर्वी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या जायच्या. काही दिवसांपूर्वीपासून पत्रे लिहिली जायची. आता तर पत्र कसे लिहायचे हे देखील युवकांना माहिती नसल्याचे वास्तव आहे. यामुळे कागदाचा अपव्यय मात्र वाचला आहे.(शहर प्रतिनिधी)
सोशल मीडियामुळे दिवाळीची शुभेच्छापत्रे नामशेष
By admin | Updated: November 11, 2015 01:28 IST