प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसाठी घेतले उलटे टांगून
By Admin | Updated: September 4, 2014 23:59 IST2014-09-04T23:59:38+5:302014-09-04T23:59:38+5:30
लाल नाला व पोथरा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली; पण कारवाई झाली नाही़ यामुळे प्रशासनाची झोप उघडावी म्हणून प्रहार संघटनेने अभिनव आंदोलन केले.

प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसाठी घेतले उलटे टांगून
लालनाला व पोथरा प्रकल्प : अभिनव आंदोलनाने सारेच चकित
समुद्रपूर : लाल नाला व पोथरा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लावण्याबाबत प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली; पण कारवाई झाली नाही़ यामुळे प्रशासनाची झोप उघडावी म्हणून प्रहार संघटनेने अभिनव आंदोलन केले. तहसील कार्यालयाच्या समोरील चिचेंच्या झाडाला गजानन कुबडे यांनी उलटे लटकवून घेतले. या आंदोलनामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली़ यात दहा आंदोलकांना अटक करून सुटका करण्यात आली़
प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या सुटाव्या याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक निवेदने देण्यात आली़ यात कोरा व पोथरा प्रकल्पग्रस्तांना ज्यांची गावे पुनर्वसित झाली, त्यांना मुलभूत सुविधा देण्यात याव्या, दोन्ही प्रकल्पातील अनेकांचे अनुदान प्राप्त झाले नाही, प्रकल्पाचे वेस्टविअरमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाते, यामुळे त्याची रूंदी वाढवावी, वडिलांच्या नावे असलेल्या शेतीचे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर वाटणीपत्र व्हावे, निराधार योजनेंतर्गत द्यावयाचे अर्ज ग्रामीण स्तरावर तलाठ्याने स्वीकारावे, उसेगाव येथील पाणी टंचाई कायम दूर करावी, भूमी अधिकार अभिलेख कार्यालयाने पुनर्मोजणी व एकत्रीकरणातील चुकांची करून द्यावी आदी मागण्यांचा समावेश होता; पण प्रशासनाने या निवेदनाकडे दुर्लक्ष केले़
यामुळे प्रहारने आंदोलनाचा प्रवित्रा घेतला. गुरूवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय परिसरात चिंचेच्या झाडाला गजानन कुबडे यांनी स्वत:ला उलटे लटकवून घेतले़ समुद्रपूर पोलिसांनी आंदोलनकर्त्यास ताब्यात घेतले. शिवाय पोलिसांनी गजानन कुबडे, देवा धोटे, सुरेश नारनवरे, राजेश बोभाटे, राजेंद्र व मंगेश तांदूळकर, राहुल भगत, रवींद्र चौधरी, प्रदीप मून, प्रवीण जायदे या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले़ मुंबई पोलीस कायदा १३५ नुसार ठाणेदार अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात उमेश हरणखेडे यांनी ही कारवाई केली.(तालुका प्रतिनिधी)