पाणीदार गावासाठी सरसावले हात
By Admin | Updated: May 5, 2017 01:58 IST2017-05-05T01:58:07+5:302017-05-05T01:58:07+5:30
पाणी फाऊंडेशनद्वारे घेण्यात येत असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये सध्या श्रमदानाची जणू होडच लागली आहे.

पाणीदार गावासाठी सरसावले हात
महिलांकडून अल्पोपहाराची व्यवस्था : आबालवृद्धही मदतीला
पिंपळखुटा : पाणी फाऊंडेशनद्वारे घेण्यात येत असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांमध्ये सध्या श्रमदानाची जणू होडच लागली आहे. प्रत्येक हात गाव पाणीदार करण्यासाठी झटू लागला आहे. गावात जलमोहीम सुरू झाली असून विविध कामे प्रगतिपथावर आहेत.
पाणीदार गावासाठी ग्रामस्थांनी कामाला वेग दिला आहे. दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष सूमन उईके या श्रमदात्यांच्या अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करण्यात व्यस्त दिसतात. मजुरी करून पोट भरणाऱ्या कल्पना उईके या देखील न्याहारीची व्यवस्था करून श्रमदात्यांचा उत्साह वाढवित आहेत. १५ दिवसांत श्रमदान करणाऱ्या हातांची संख्या वाढत आहे. गावात शोषखड्डे, नाला सरळीकरण, वनराई बंधारा, वृक्षारोपण खड्डे, विहीर दुरूस्ती, माती परिक्षण व उताराला पाणी अडविणारे आडवे चार खड्डे आदी कामे पूर्ण झालीत. श्रमदात्यांमध्ये सर्वच नागरिक सहभागी होत आहेत. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत नित्यनेमाने श्रमदात्यांचे हात राबत असून गाव पाणीदार करण्याची मोहीम जोर पकडत आहे.(वार्ताहर)