गारपिटीने फेरले रबीवर पाणी
By Admin | Updated: March 7, 2016 01:53 IST2016-03-07T01:53:22+5:302016-03-07T01:53:22+5:30
जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यात रोजच सांयकाळी पाऊस येत आहे.

गारपिटीने फेरले रबीवर पाणी
आठवड्यापासून अवकाळी पाऊस सुरूच : गहू, चणा अजूनही शेतातच
वर्धा : जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यात रोजच सांयकाळी पाऊस येत आहे. रविवारी सायंकाळी रोहणा, आंजी (मोठी) परिसरात पावसासह गारपीट झाले. सेलू परिसरात पावसाच्या सरी पडल्या. सतत होत असलेल्या या पावसामुळे गहू व इतर पीक धोक्यात आले आहे. पहिल्या दिवसाच्या नुकसानीचा सकाळी सर्व्हे झाल्यानंतर त्याच गावात सायंकाळी पाऊस येत असल्याने सर्वेक्षणही कागदावरच होत असल्याचे दिसून आले आहे.
शनिवारी समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. हिंगणघाट तालुक्यात मुसळधार पाऊस आला. समुद्रपूर परिसरातील गिरड, मोहगाव, साखरा, समुद्रपूर जाम परिसरात गारपीट झाले. यामुळे शेतातील गहू झोपला. जिल्ह्यात गत आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस आपली हजेरी लावत आहे. या पावसामुळे पिकाचे नुकसान होत आहे. शासनाचे अधिकारी शेताच्या बांधापर्यंत अजूनही पोहचला नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार अथवा नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
हिंगणघाट तालुक्यात घरांची पडझड
हिंगणघाट : शनिवारी सायंकाळी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सुमारे सव्वाशे हेक्टर मधील पिकांच्या नुकसाणीचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक गावात घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आ. समीर कुणावार यांनी या गावात जात प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.
या गारपिटीमुळे १०० हेक्टर मधील गहू व २५ हेक्टर चन्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार दीपक करंडे यांनी व्यक्त केला. तालुक्यातील वणी, दाभा, कानापूर, खैराटी, बोरगाव या गावांना सर्वाधिक गारपीटीचा फटका बसला. वणी येथे सर्वाधिक घरांचे नुकसान झाले. त्यापैकी काही झोपड्या जमीनदोस्त झाल्या.