समुद्रपुरातही गुटखा बंदी मोहीम
By Admin | Updated: October 25, 2014 01:38 IST2014-10-25T01:38:43+5:302014-10-25T01:38:43+5:30
येथील ठाणेदार रजेवर गेल्याने त्यांचा प्रभार गिरडचे ठाणेदार ओमकांत चिंचोळकर यांना देण्यात आला.

समुद्रपुरातही गुटखा बंदी मोहीम
समुद्रपूर : येथील ठाणेदार रजेवर गेल्याने त्यांचा प्रभार गिरडचे ठाणेदार ओमकांत चिंचोळकर यांना देण्यात आला. त्यांनी प्रभार स्वीकारताच समुद्रपूर येथे गुटखा बंदी करण्याची कारवाई सुरू केली. तीन दिवसांत दुकानातील गुटखा नष्ट करण्याच्या सूचना देत दुकानदारांना कारवाईची तंबी दिली. सोबतच त्यांनी परिसरात स्वच्छता राबविण्याच्याही सूचना केल्यात.
याच वेळी समुद्रपूर मधील चौकामधील दुकानासमोर असलेल्या कचऱ्याचे ढिग उचलविण्यास लावून स्वच्छतेची जाणीव करून दिली. पदभार स्वीकारताच बेशिस्तीत वाहन चालविणाऱ्या वाहन चालकाची तपासणी करीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे वाहनचालकामध्ये दहशत निर्माण झाली. सोबत रस्त्याच्या कडेला उभ्या ठेवलेल्या वाहणावर दंडात्मक कारवाई तर रस्त्याच्या बाजूला बसलेल्या छोट्या दुकानदारांना मर्यादित दुकान लावण्याची ताकीत दिली. तर गिरडमध्ये गुटखाबंदी अभियान सुरू केल्यानंतर समुद्रपूरमध्ये सुद्धा प्रत्येक पान टपरीची तपासणी करीत यापुढे गुटखा विक्री करायची नाही, याबाबत सूचना दिली.
याच वेळी त्यांनी दुकानासमोर असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगांकडेहीे लक्ष वधले. दुकानदारांना त्यांच्या दुकानासमोरील कचऱ्याचे ढिग उचलण्यास लावून त्यांना स्वच्छतेची जाणीव करून दिली व पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत मोहिमेला हातभार लावला. यामुळे काही नागरिकांनी या कामाचे कौतुक केले. मात्र काही वाहन चालकांना दंडुकांचा प्रसाद खावा लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवसात कायदा काय असतो, याची जाणीव प्रभारी ठाणेदारांनी करून दिली, असे बोलल्या जात आहे. या कारवाईत सातत्याची गरज असल्याची चर्चा आहे. (तालुका प्रतिनिधी)