गुरूदेव क्रांती ज्योत यात्रा सेवाग्राम आश्रमात

By Admin | Updated: September 1, 2014 00:08 IST2014-09-01T00:08:00+5:302014-09-01T00:08:00+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच हजारो हुतात्म्याची बलीदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिले. गांधीजी आणि महाराजांचे स्वातंत्र्य पूर्वीचे व नंतरचे कार्य देशालाच नव्हे

Gurudev Kranti Jyoth Yatra Sewagram Ashram | गुरूदेव क्रांती ज्योत यात्रा सेवाग्राम आश्रमात

गुरूदेव क्रांती ज्योत यात्रा सेवाग्राम आश्रमात

सेवाग्राम : राष्ट्रपिता महात्मा गांधी, वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच हजारो हुतात्म्याची बलीदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिले. गांधीजी आणि महाराजांचे स्वातंत्र्य पूर्वीचे व नंतरचे कार्य देशालाच नव्हे तर जगासाठी आदर्श आहे. आज त्यांचे विचार, कार्य, भजने, गीत व तत्वज्ञान जगासाठी प्रासंगिक होत आहेत. देशातील नव्या पिढीला हा इतिहास माहिती व्हावा. राष्ट्रभक्ती, पे्रम, बलीदान याची जाणिव व जागृती निर्माण व्हावी तसेच राष्ट्रपुरुषांच्या यादीत वं. तुकडोजी महाराजांचा समावेश असावा यासाठी गुरुदेव क्रांती ज्योत यात्रा क्रांती दिनापासून काढण्यात आली आहे. शनिवारी ती सेवाग्राम आश्रमात पोहचली.
आदी निवास मध्ये पालखी व क्रांती ज्योत ठेवून सामूदायिक प्रार्थना व सर्वधर्म प्रार्थना झाल्यानंतर उपस्थितांनी ज्योतिचे दर्शन घेतले. याबाबत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ आश्रमचे प्रचार सेवाधिकारी बबन वानखेडे यांनी यात्रेची माहिती दिली. ९ आॅगस्ट हा क्रांती दिन. याच दिवशी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्याच्या प्रचार युद्धात उडी घेतली. आष्टी (शहीद) येथे सभा घेतली. पुढे तळेगाव, आर्वी, खरांगणा, वर्धा, हिंगणघाट, वरोरा आणि चिमूर येथे सभा झाल्या. स्वातंत्र्यासाठी सर्वांनी लढा द्या. प्राणांचे बलीदान देण्याचा प्रसंग आला तरी मागे फिरू नका. हा देश आपला आहे. या माय भूमीला गुलामीतून मुक्त करण्याचे आवाहन महाराजांनी केले होते. भजन, गीते, खंजेरी यातून क्रांती घडली. २८ आॅगस्ट १९४२ रोजी चंद्रपूर येथे ब्रिटीशांनी त्यांच्या भजनातील शब्दाचा ‘गरूड’ आणि पत्थर सारे बनेंगे ‘बॉम्ब’ असा चुकीचा अर्थ काढून त्यांना तुरुंगात डांबले. यामुळे जनतेचा विरोध, आक्रोश वाढतच गेला. शेवटी तीन महिन्यानंतर दबावाला घाबरून सरकारने त्यांना मुक्त केले. वास्तविक महात्मा गांधीजींचे कार्य महाराजांनी पुढे नेले. खेड्या पाड्यात पोहचविले. हा इतिहास विसरून चालणार नाही. हाच इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवायचा आहे असे त्यांनी यावेळी ‘लोकमतशी’ बोलतांना सांगितले.
वं. राष्ट्रसंतांच्या कार्याची भजनांची व गितांची दखल जगाने घेतली. ग्रामगीता हा ग्रंथ घरोघरी पोहचला. देशाचे प्रथम प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांशी सल्लामसलत केली. जपानमध्ये गाईलेले ‘हर देश मे तू’ या गाण्यातून परमेश्वर एक असल्याचे सांगितले. महाराजांचे कार्य एका क्रांतीकाराचे असले तरी, तरी ते अहिंसावादी होते. त्यांनी रचनात्मक कार्याला प्रेरणा दिली. असे असताना त्यांचा शासनाला विसर पडला आहे. याकरिता ही यात्रा काढण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. क्रांती ज्योत यात्रेत दमोधर पाटील, भानूदास कराळे, माणिक टोंग, नामदेव गव्हाळे, रामदास देशमुख, मंगेश सिरसाट सहभागी आहेत. आश्रमात दत्ताभाऊ राऊत, डॉ. शिवरचण ठाकूर, बाबाराव खैरकर, अशोक गिरी, सिद्धेश्वर, प्रशांत, हिराभाई, सागर कोल्हे, मालती, शोभा, ललीता, संगिता चव्हाण, प्रभा शहाणे, वैशाली आत्राम, माया ताकसांडे, वैशाली बघेल उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Gurudev Kranti Jyoth Yatra Sewagram Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.