वाढोणा(ठाकरे) ग्रा.पं. कार्यालयाला २४ दिवसांपासून कुलूप
By Admin | Updated: April 30, 2016 02:20 IST2016-04-30T02:20:25+5:302016-04-30T02:20:25+5:30
तालुक्यातील वाढोणा (ठाकरे) येथील ग्रामसेविकेच्या बेबंदशाही कारभाराने त्रस्त गावकऱ्यांनी ग्रामसेविकेची बदली होत नाही.

वाढोणा(ठाकरे) ग्रा.पं. कार्यालयाला २४ दिवसांपासून कुलूप
प्रशासनाकडून कुठलीही कारवाई नाही
आर्वी : तालुक्यातील वाढोणा (ठाकरे) येथील ग्रामसेविकेच्या बेबंदशाही कारभाराने त्रस्त गावकऱ्यांनी ग्रामसेविकेची बदली होत नाही. तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय उघडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. यामुळे गत २४ दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाला गावकऱ्यांनी कुलूप ठोकले आहे. याची माहिती वरिष्ठांना दिली असली त्यांच्याकडून यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
येथील ग्रामसेविका खंडार यांच्या बेबंदशाही कारभाराविरूद्ध गावकऱ्यांनी चारवेळा पं.स. गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांना निवेदन देऊन ग्रामसेविकेची बदली करण्याची मागणी लावून धरली; परंतु यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने गावकऱ्यांनी कुलूपबंद आंदोलन सुरू केले. यावर अद्याप तोडगा न निघाल्याने ४ एप्रिलपासून गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. तशी लेखी माहिती गटविकास अधिकारी यांना दिली.
याबाबत पोलीस विभागालाही निवेदन देण्यात आले; परंतु यावर अद्याप कुठलाही तोडगा निघाला नाही. २४ एप्रिल ग्रामसेविकास खंडार यांनी गावात ग्रामसभा घेण्याची दवंडी दिली; परंतु गावकऱ्यांनी ग्रामसभेला हजेरी लावली नाही. ५ मे पर्यंत या ग्रामसेविकेची बदली करण्यात आली नाही तर याविरूद्ध गावकरी मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेवून तोडगा काढण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत आर्वी पं.स.चे गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.(तालुका प्रतिनिधी)