४३४ ग्रा.पं.ला हिरवे कार्ड
By Admin | Updated: April 8, 2016 01:49 IST2016-04-08T01:49:32+5:302016-04-08T01:49:32+5:30
नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतनिहाय सर्वेक्षण वर्षातून दोनवेळा करण्यात येते.

४३४ ग्रा.पं.ला हिरवे कार्ड
संजय मीणा : २,८७५ पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण
वर्धा : नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतनिहाय सर्वेक्षण वर्षातून दोनवेळा करण्यात येते. पावसाळ्यानंतर जिल्ह्यातील ५१४ ग्रामपंचायतींना २ हजार ८७५ स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ४३४ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले तर ८० ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना नियमित शुद्धीकरण करून तसेच ब्लिचिंग पावडर असलेलेच पाणी पुरवण्यालाच प्राधान्य देण्यात आल्यामुळे पाणी पिण्या अयोग्य असलेला एकही स्त्रोत नसल्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले नाही. पिण्याच्या पाण्यामुळे ग्रामीण भागात जलजन्य आजार उद्भवू नये यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करून पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात येते. या तपासणीनंतर ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड, पिवळे कार्ड तसेच ज्या स्त्रोतांचे पाणी पिण्या अयोग्य आहे, अशा ग्रामपंचायतीमधील स्त्रोतांना लाल कार्ड देण्यात येते.
जिल्ह्यात एकूण ७२५ ठिकाणी नळयोजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. या व्यतिरिक्त १,४०४ हातपंप व ७४५ विहिरी आहेत. या सर्वच स्त्रोताचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ४३४ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. येथील पाणी पिण्यायोग्य असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे.या व्यतिरिक्त पिवळे कार्ड देण्यात आलेल्या गावांना त्यांच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)
९५ गावांना अस्वच्छ पाणी
जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ८० ग्रामपंचायतींना पिवळे कार्डे देण्यात आले आहे. या गावात पुरविण्यात येत असलेले पाणी अशुद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. पाण्याच्या या अशुद्धीकरणाला ठिकठिकाणी होत असलेला पाण्याचा अपव्यय जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. या गावातील पाण्याच्या स्त्रोताजवळ मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे दिसून आले आहे. या पिवळ्या कार्डाचे हिरव्या कार्डात रूपांतरित करण्यासाठी संबंधित स्वत:च्या सभोवतालचा परिसर स्वच्छ असण्यासोबत फ्लॅटफॉर्म फुटलेला असेल, अनियमित शुद्धीकरण किंवा ब्लिचिंग याकरिता एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाणी शुद्धीकरणासाठी जलसुरक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी दिली.