ग्रंथोत्सव केवळ औपचारिकता

By Admin | Updated: January 30, 2016 02:27 IST2016-01-30T02:27:47+5:302016-01-30T02:27:47+5:30

वाचन संस्कृती जोपासण्याकरिता ग्रंथोत्सव आयोजनाचा खटाटोप या काही वर्षांत शासनाच्या ग्रंथालय विभागाद्वारे केला जात आहे.

Granth Festival is just a formality | ग्रंथोत्सव केवळ औपचारिकता

ग्रंथोत्सव केवळ औपचारिकता

थंड प्रतिसाद : वाचकांची पाठ, साहित्य विक्रीही नाममात्रच
श्रेया केने वर्धा
वाचन संस्कृती जोपासण्याकरिता ग्रंथोत्सव आयोजनाचा खटाटोप या काही वर्षांत शासनाच्या ग्रंथालय विभागाद्वारे केला जात आहे. गं्रथोत्सवाची व्यापक प्रसिद्धी गरजेची असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रंथोत्सवाला मिळत असलेल्या अल्प प्रतिसादावरून दिसते. त्यामुळे थोडी तरी गर्दी असावी म्हणून काही शाळेच्या विद्यार्थ्याना जबरीने ग्रंथोत्सवात हजर केले जात असल्याचे शुक्रवारी दिसून आले. इतकेच नव्हे तर बोजड आणि रटाळ व्याख्यानांचा मारा करून त्यांना गुपचूप ऐकायला लावण्याचा विचित्र प्रकारही ग्रंथोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दिसून आला.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा गं्रथालय संघ अशी भरगच्च आयोजन समितीची यादी आहे. शासकीय यंत्रणेकडून या ग्रंथोत्सवाचे गत तीन वर्षांपासून आयोजन केले जाते. या माध्यमातून वाचकापर्यंत अधिकाधिक ग्रंथसंपदा पोहचावी, वाचन संस्कृती जोपासावी याकरिता ग्रंथोत्सवाचे प्रयोजन आहे. मात्र ग्रंथोत्सवाला वर्धेकरांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद पाहता ग्रंथोत्सवाचे आयोजन ही केवळ औपचारिकता ठरत असल्याचे दिसून येते.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न घेण्याऐवजी शासकीय आदेश असल्याने ग्रंथोत्सव घेऊन मोकळे होण्याचा प्रकार एकूनच या तीन दिवसांत दिसून आला. या ग्रंथोत्सवाच्या आयोजनाची तितकीशी प्रसिद्धी झाली नसल्याची बाब अनेकांनी प्रतिक्रियांतून व्यक्त केली.
या तीन दिवसीय सोहळ्याला वर्धेकरांनी अल्प प्रतिसाद दिला. त्यामुळे ग्रंथविक्रीही माफकच प्रमाणात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रकाशक व पुस्तक विक्रेत्यांकडून ग्रंथोत्सवाला दिवसेंदिवस कमी प्रतिसाद मिळत असल्याचेही निदर्शनास आले. मोजके चार- पाच स्टॉल्स अपवाद वगळता मागील वर्षांच्या तुलनेत यंदा बुक स्टॉल्सही कमी झालेले आहेत.
हा मंदावत असलेला प्रतिसाद ग्रंथ महोत्सव ही औपचारिकता असल्याचीच साक्ष देत असल्याचे पहावयास मिळाले.

Web Title: Granth Festival is just a formality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.