वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याची विक्रमी आवक
By Admin | Updated: March 16, 2016 08:38 IST2016-03-16T08:38:15+5:302016-03-16T08:38:15+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धाच्या मार्केट यार्डमध्ये मागील आठवड्यात धान्यमालाची या हंगामातील विक्रमी आवक

वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याची विक्रमी आवक
वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धाच्या मार्केट यार्डमध्ये मागील आठवड्यात धान्यमालाची या हंगामातील विक्रमी आवक झाली. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकाचे उत्पन्न कमी झाले असताना वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेत धान्य मालाची आवक दीडपटीने वाढली आहे. संचालक मंडळाने धान्य मालाची पाहणी करीत आढावा घेतला. यावेळी प्रस्तावित सुधारणाही सूचविण्यात आल्या.
वर्धा बाजार समितीत मागील वर्षी सोयाबीन ८२ हजार क्विंटल तर यावर्षी १ लाख २० हजार क्विंटल आहे. कापूस १ लाख ४० हजार क्विंटल तर यंदा १ लाख ९० हजार क्विंटल खरेदी करण्यात आला आहे. बजाज चौकाजवळील भाजी बाजारात सुधारणेच्या दृष्टीकोनातून सेस वसुली, भाडेपट्टीत २० ते ३० टक्के वाढ सुचविण्यात आली आहे. प्रस्तावित भाजी बाजार बांधकामाचा आराखडा तयार असून लवकरच अत्याधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा मानस आहे. सोयाबीन, चना, तूर व जिल्ह्यातील अन्य बाजार समितीपेक्षा सातत्याने शेतकऱ्यांना अधिक भाव मिळत आहे. बाजार समितीमार्फत ५ रुपयांत शेतकऱ्यांना भोजन दिले जाते. शेतकऱ्यांनी विकलेल्या शेतमालाचे चुकारे शेतमाल विकल्यानंतर लगेच मिळत आहे. कोणत्याही प्रकारची सूचना देण्यासाठी साऊंड सिस्टिम लावली आहे. संचालक मंडळ, चांगले व्यापारी व अडते, हमाल व मापारी आणि सहयोगी कर्मचारी यांची सांगड योग्यपणे बसली. कोणत्याही प्रकारची तक्रार न येता एकमेकांच्या साह्याने शेतकऱ्यांना एक चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणे व सोई पुरविणे हेच उद्दिष्ट असल्याचे उपसभापती पांडुरंग देशमुख यांनी सांगितले.
बाजार समिती यार्डमध्ये मागील आठवड्यात आलेल्या विक्रमी धान्याची पाहणी करताना शेतकऱ्यांशी चर्चा करीत होते. याप्रसंगी सभापती शरद देशमुख, उपसभापती पांडुरंग देशमुख, संचालक श्याम कार्लेकर, रमेश खंडागळे, विजय बंडेवार, प्रकाश पाटील, मुकेश अळसपुरे, पवन गोडे, शरद झोड, दत्ता महाजन, सुरेशसिंग मेहर, जगदीश मस्के, भूषण झाडे, अरविंद भुसारी, दिनेश गायकवाड, कमलाकर शेंडे, वैशाली उमाटे, अपर्णा मेघे, सचिव समीर पेंडके, सहा. सचिव माधव बोकाडे, व्यापारी भंवरलाल चांडक, जुगलकिशोर चांडक, कैलास काकडे, अडते प्रशांत जगताप, साटोणे, आतिक, नासरे, ढवळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बाजार समिती शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अधिकाधिक सोई पुरविण्याचे प्रयत्न केले जातील, असे मत उपसभापती देशमुख व संचालकांनी व्यक्त केले.(कार्यालय प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या सुविधांमध्ये वाढ करणार
४वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी असताना विक्रमी आवक झाली आहे. सोयाबीन, कपाशीच्या खरेदीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात ही नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीवर विश्वास टाकल्याने अधिकाधिक सुविधा पुरविण्यावर भर देणार असल्याचे सभापती, उपसभापती आणि संचालकांनी बाजार समितीचा आढावा घेताना व्यक्त केले. शिवाय बजाज चौकातील भाजी बाजारालाही आधुनिक रूप देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. याबाबतचा आराखडा तयार असून ही कामे लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचेही शेतकऱ्यांना सांगण्यात आले.