समुद्रपूर पंचायत विस्तार अधिकाऱ्याविरोधात ग्रामसेवकांचा एल्गार
By Admin | Updated: January 17, 2015 02:24 IST2015-01-17T02:24:53+5:302015-01-17T02:24:53+5:30
समुद्रपूर येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पं.) एस. के. हेडाऊ यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना एकत्र आल्या आहे.

समुद्रपूर पंचायत विस्तार अधिकाऱ्याविरोधात ग्रामसेवकांचा एल्गार
वर्धा : समुद्रपूर येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पं.) एस. के. हेडाऊ यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवत तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना एकत्र आल्या आहे. या संघटनांनी त्यांचा प्रभार काढा, अन्यथा लेखणीबंद आदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
सदर पंचायत विस्तार अधिकारी ग्रामसेवकांच्या अडचणी तर ऐकून घेत नाहीच शिवाय ग्रामसेवकांच्या विरोधात काम करतात. इतकेच नव्हे, तर दमदाटी करुन मानसिकता खराब करीत आहे. शासकीय कामांबाबत ग्रामसेवकांनी विचारणा केल्यास योग्य उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे देतात. ग्रामसेवक संवर्गाचा क्लेम व पगार फाईलवर उलटसुलट अभिप्राय देऊन जाणिवपूर्वक त्या प्रलंबित ठेवतात, असा आरोप ४० ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीने दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेनेही सदर विस्तार अधिकाऱ्याची तक्रार केली आहे. यामध्ये सदर विस्तार अधिकारी चार वर्षांपूर्वी कारंजा पंचायत समितीत कार्यरत असताना ग्रामसवेकांच्या त्यांच्याविरोधात तक्रारी होत्या. तेव्हा त्यांना यापुढे कोणत्याही पंचायत समितीमध्ये पंचायत विभागात पदस्थापना करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली असता त्यांची तेथून बदली करण्यात आली होती. मात्र त्यांचे समुद्रपूरला त्याच पदावर स्थानांतर करण्यात आले, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष कुंदन वाघमारे व प्रमोद बिडवाईक यांनी केला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
मागील सहा वर्षांपासून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहे. मात्र ग्रामसेवक दबावतंत्राचा वापर करून आपली कामे करवून घेण्याचा प्रयत्न करतात. उलट त्यांना विश्वासात घेऊनच ग्रामविकासाची कामे करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही.
- एस.के. हेडाऊ,
विस्तार अधिकारी(पं.), पंचायत समिती, समुद्रपूर