ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग
By Admin | Updated: June 28, 2015 02:34 IST2015-06-28T02:34:47+5:302015-06-28T02:34:47+5:30
तालुक्यात होत असलेल्या तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होताच मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग
सर्वच पक्ष सरसावले : उमेदवार शोध मोहिमेलाही प्रारंभ
सेलू : तालुक्यात होत असलेल्या तीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होताच मोर्चेबांधणीला वेग आला आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सरसावले असून उमेदवार शोध मोहिमही सुरू झाली आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या येळाकेळी व हिंगणी तसेच चारमंडळ ग्रा.पं. ची सार्वत्रिक निवडणूक २५ जुलै रोजी होत आहे. हिंगणी ग्रामपंचायतीवर भाजपा समर्थित तर येळाकेळी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित गटाचा कब्जा आहे. निवडणुका जाहीर होताच उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली आहे. आरक्षित जागेवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गावपुढारी कामाला लागले आहेत. सध्या तालुक्यात जयस्वाल, शेंडे, रणनवरे व आमदाराचा गट सक्रिय आहे. पक्षाच्या नावावर निवडणुका लढविल्या जाणार नसल्या तरी जयस्वाल व शेंडे गट विधानसभा निवडणुकीपासून एकत्र आल्याने व भाजपामध्ये दोन गट सक्रिय असल्याने नेते एकत्रित आले असले तरी कार्यकर्ते एकत्र येतात काय, हे या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
भाजपाचे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढल्यास तालुक्यात भाजप व काँग्रेस समर्थित उमेदवार आमने-सामने राहण्याची शक्यता आहे. तालुक्याचे लक्ष हिंगणी व येळाकेळी ग्रा. पं. निवडणुकीकडे लागले आहे. सत्तारूढ गट विकास कामावर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. गावापुरती निवडणूक असली तरी या दोन ग्रामपंचायतींवर आपल्या गटाची सत्ता राहावी म्हणून जिल्हा व तालुका पातळीवरील राजकीय नेते सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(शहर प्रतिनिधी)