ग्रामसभेतून ग्रामसचिवासह सदस्यांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 00:31 IST2016-10-03T00:31:59+5:302016-10-03T00:31:59+5:30
शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचातीपैकी एक असलेल्या साटोडा ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी जयंती निमित्य रविवारी ग्रामसभा झाली.

ग्रामसभेतून ग्रामसचिवासह सदस्यांचे पलायन
साटोडा येथील प्रकार : नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना उडाली भंबेरी; समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन
वर्धा : शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचातीपैकी एक असलेल्या साटोडा ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी जयंती निमित्य रविवारी ग्रामसभा झाली. या सभेत येथील ग्रामस्थांनी सरपंच प्रिती शिंदे, ग्रामसवेक सुनील गावंडे व सदस्य सागर बुचे यांच्यावर समस्यांचा भडीमार केला. यावेळी ग्रामस्थांच्या प्रश्नांसमोर निरूत्तर झालेले ग्रामसेवक गावंडे व सदस्य बुचे यांनी सभेतून पलायन केल्याने नागरिक चांगलेच संतापले.
यावेळी ग्रामस्थ झाडाच्या सावलीत ग्रामपंचायत आपल्या समस्येचे निराकरण करेल या आशेने उभे राहून वाट बघत होते; मात्र त्यांची आशा हवेतच विरल्याचे दिसून आले. यामुळे ही ग्रामसभा कशासाठी घेतली असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी केला.
ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अंजनीमाता नगरातील समस्येबाबत स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत महिला व नागरिकांनी निवेदन दिले होते. यात ग्रामसेवक व सरपंच यांनी स्वत: पाच दिवसाच्या आत निवेदनातील समस्या निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यावर अद्याप कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे तलावातील पाणी घरात व विहिरीत जात आहे. नळयोजना नसल्याने नाईलाजाने तेच पाणी नागरिकांना प्यावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
अंजनी माता वॉर्डातील या समस्यांबाबत नागरिकांनी ग्राम पंचायत सदस्य सागर बुचे यांच्याशी बोलले असता या भागातील नागरिकांनी मला मतदान केले नाही. म्हणून वॉर्डात कुठलेही काम होणार नाही, असे ते म्हणाल्याचे सुनंदा जगताप, शोभा कोवे, जयश्री चौधरी, वंदना तळवेकर, आशा निदेकर, पुष्पा हेलवटकर, संतोष कोलारकर, कांता वतकर, लता कोपरकर, अविनाश हेलवटकर व इतर नागरिकांनी सांगितले. या बाबत ग्रामपंचायतीने लकडे यांच्या घराजवळील व ले-आऊट मधील पाण्याची व अंजनी माता मंदिराच्या मागील बाजूच्या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)