अध्यक्ष व सचिव पदावरुन ग्रामसभेत वाद, सभा तहकूब
By Admin | Updated: February 7, 2015 01:21 IST2015-02-07T01:21:10+5:302015-02-07T01:21:10+5:30
पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे गठण करण्याकरिता येथील सिद्देश्वर मंदिरात शुक्रवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

अध्यक्ष व सचिव पदावरुन ग्रामसभेत वाद, सभा तहकूब
नाचणगाव : पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे गठण करण्याकरिता येथील सिद्देश्वर मंदिरात शुक्रवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे कामकाज सुरू असताना समितीचे अध्यक्ष व सचिवपद मिळण्याकरिता समितीतील सदस्यात वाद झाल्याने महिला व पुरूष सदस्य आमने-सामने आले. हा वाद चिघळतच गेल्याने अखेर ही सभाही तहकूब करण्यात आली.
शासन निर्णयानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची स्थापना ही ग्रामसभेतून करण्यात यावी, असे आदेश आहेत. त्यानुसार सदर समितीची स्थापना करण्यासाठी ग्रामपंचायत नाचणगाव मार्फत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. प्रशासनाने या सभेसाठी व्हिडिओ चित्रिकरण तसेच पोलीस बंदोबस्ताचे प्रयोजन केले होते. अधिकारानुसार ग्रामसेवकाने सभेच्या अध्यक्षपदी उपसरपंच तुषार पेंढारकर यांची निवड केली.
सभेला पंचायत समिती स्तरावरून विस्तार अधिकारी दीपक चौधरी तसेच ग्रामविकास अधिकारी बोबडे उपस्थित होते. ग्रामसभेच्या निर्णयानुसार २४ सदस्यीय कमिटी गठित करताना ५० टक्के महिला, एकतृतीयांश ग्रा.पं. सदस्य व इतर चार असा समावेश करून २२ सदस्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक वॉर्डाला प्रतिनिधित्व मिळावे याची दक्षताही घेण्यात आली.
अध्यक्ष व सचिवाच्या निवडीदरम्यान समितीच्या २२ सदस्यातून त्यांची निवड करावी, ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करावी, महिलांची उपस्थिती असल्याने त्यांना प्राधाण्य द्यावे, समितीत शासनाचा प्रतिनिधी कुणीही नाही, मग पाणीपुरवठा व स्वच्छता समितीबाबत विचाराचे कुणाला अशा एका ना अनेक विषयावर वाद झाला.
ग्रामपंचायत सरपंच अध्यक्ष तर ग्रामविकास अधिकारी सचिव हा पर्यायही समोर आला. या विविध पर्यायामुळे एकमत होवू न शकल्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसताच अध्यक्षाने पुढील तारीख घोषित करेपर्यंत सभा तहकूब केली.(वार्ताहर)