ग्रामपंचायत सदस्याची सचिवाला भर सभेत मारहाण

By Admin | Updated: March 31, 2017 01:43 IST2017-03-31T01:43:56+5:302017-03-31T01:43:56+5:30

शहरालगत असलेल्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीत मासिक सभा सुरू असताना सभा रद्द करण्याच्या कारणावरून

Gram Panchayat member's Secretariat assaulted in the meeting | ग्रामपंचायत सदस्याची सचिवाला भर सभेत मारहाण

ग्रामपंचायत सदस्याची सचिवाला भर सभेत मारहाण

सावंगी (मेघे) येथील प्रकार : सचिवाची पोलिसात तक्रार
वर्धा : शहरालगत असलेल्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीत मासिक सभा सुरू असताना सभा रद्द करण्याच्या कारणावरून एका ग्रामपंचायत सदस्याने सचिवाला खूर्ची मारल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी सचिवाच्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता सावंगी येथील ग्रामपंचायतीची मासिक सभा ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेला सरपंच व आठ सदस्यांसह अमरजित फुसाटेचीही उपस्थिती होती. तर काही सदस्य ग्रामपंचायतीच्या आवारात उभे होते. सभेकरिता प्रारंभी एकूण आठ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. संख्याबळ अपुरे होत असल्याने यावेळी सदस्य अमरजित फुसाटे याने ही सभा रद्द करा, असे म्हणून सभागृहातून काढता पाय घेतला.
दरम्यान, सभा सुरू करण्याकरिता आवश्यक संख्याबळ उपस्थित झाल्याने सविचाने सरपंचांच्या परवानगीने सभा सुरू केली. कालांतराने सदस्य फुसाटे याने ग्रामसचिव चांभारे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधत सभेबाबत विचारणा केली. यावेळी सचिवांनी सभा सुरू असल्याचे सांगताच फुसाटेने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी ३.५० वाजता ग्रामपंचायत गाठत चांभारे यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. यावेळी फुसाटेने सचिवाला खुर्ची फेकून मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी सरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित असल्याचे चांभारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
चांभारेंच्या तक्रारीवरून फुसाटेविरूद्ध भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०६, १८६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ग्रामसचिवांवर असे हल्ले नेहमी होत असल्याने अशा सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामसेवक युनियनच्यावतीने करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

ग्रामसेवक युनियनचे जिल्हाधिकारी व एसपींना निवेदन
सावंगी (मेघे) येथील ग्रामसचिव चांभारे यांना मारहाण प्रकरणाचा ग्रामसेवक संघटनेने निषेध केला आहे. शिवाय ग्रामपंचायत सदस्य फुसाटे याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष सुधीर भोसले, तालुका सचिव संदीप दुधबडे, विभागीय उपाध्यक्ष मनोहर चांदूरकर, जिल्हा सल्लागार कैलास बर्धिया, तालुका उपाध्यक्ष कळमकर, जिल्हा सचिव सुधाकर आसुटकर यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Gram Panchayat member's Secretariat assaulted in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.