बायोमेट्रीक पध्दतीने धान्य वितरण
By Admin | Updated: January 18, 2017 00:39 IST2017-01-18T00:39:11+5:302017-01-18T00:39:11+5:30
शासकीय धान्य दुकानात धान्याचा होणारा काळाबाजार होत असलेल्याचे अनेक वेळा समोर आले.

बायोमेट्रीक पध्दतीने धान्य वितरण
नाचणगावात प्रारंभ : धान्याच्या काळ्या बाजारावर लगाम
नाचणगाव: शासकीय धान्य दुकानात धान्याचा होणारा काळाबाजार होत असलेल्याचे अनेक वेळा समोर आले. हा काळाबाजार रोखण्याकरिता व सार्वजनिक वितरण व्यवस्था पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी बायोमेट्रीक पध्दतीची सुरुवात केली.
वर्धा जिल्ह्यात या पध्दतीने स्वस्त धान्य वितरण दुकानातून धान्याचे वितरण होणार आहे. या योजनेचा शुभारंभ वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील एस.एन. राऊत यांच्या स्वस्त धान्य दुकानात तहसीलदार तेजस्वनी जाधव यांच्या हस्ते झाला. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी चव्हाण, निरीक्षण अधिकारी प्रज्वल पाथरे, पुरवठा निरीक्षक विनोद काळे उपस्थित होते.
शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेली पध्दत ग्राहकाच्या फायद्याची ठरणार आहे. या पध्दतीद्वारे कुटुंबातील आधार जोडलेल्या कुण्या एका व्यक्तीच्या अंगठ्याचा ठसा यामध्ये वापरला जाणार आहे. तसेच दुकानात किती धान्यसाठा शिल्लक आहे.
किती धान्याचे वितरण झाले याची सुध्दा माहिती वरच्या स्तरापर्यंत त्वरीत पोहचणार असल्याचे तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी यावेळी सांगितले.
सदर योजनेत ग्राहकांना तेव्हाच प्रिंट मिळणार आहे. तसेच भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. ज्याचे राशन कार्ड आहे तोच हजर असणे अनिवार्य ठरणार आहे.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते. सदर योजनेबाबत प्रमोद बिरे, बालु अंबुलवार, बालु डफडे, अरविंद खरोडे, अनुप राऊत तसेच उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)