६११ विद्यार्थ्यांना पदवीदान
By Admin | Updated: March 23, 2015 01:49 IST2015-03-23T01:49:06+5:302015-03-23T01:49:06+5:30
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पार पडला.

६११ विद्यार्थ्यांना पदवीदान
वर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत समारंभ सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पार पडला. या समारोहात विविध शाखेतील ६११ विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, कुलपती दत्ता मेघे यांच्या हस्ते दीक्षा प्राप्त केली.
या समारोहात वैद्यकीय शाखेतील २८० व दंतविज्ञान शाखेतील १२१ (पीएचडी, एम.डी., एमएस, स्रातकोत्तर, स्रातक), आयुर्वेद शाखेतील ४६, पॅरामेडिकल शाखेतील १५ आणि परिचर्या शाखेतील १३२ विद्यार्थ्यांसह एकूण ६११ विद्यार्थ्यांनी दीक्षा प्राप्त केली. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना एकूण ७७ सुवर्ण पदके व तीन रौप्य पदकांसह १४ चान्सलर अवॉर्ड आणि रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात वैद्यकीय शाखेतील डॉ. कुशल काळवीट सर्वाधिक पुरस्कारांचे मानकरी ठरले असून त्यांना ११ सुवर्ण पदके व चार पुरस्कार प्राप्त झाले. डॉ. सोनल गोयल यांना सात सुवर्ण पदके, डॉ.नूपुर श्रीवास्तव यांना सहा सुवर्ण पदके व एक पुरस्कार, डॉ. रोहित जुनेजा यांना चार सुवर्ण पदके, करिश्मा माखिजा यांना चार सुवर्ण व एक रौप्य पदक, सोनम वासेकर तीन सुवर्ण व एक रौप्य पदक, मोहिनीकुमारी यांनी तीन सुवर्ण पदके पटकाविली. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, पॅरामेडिकल आणि परिचर्या शाखेतील एकूण ९४ विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य पदके आणि अन्य रोख पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. शिवाय १७ विद्यार्थ्यांना विद्यापीठाची फेलोशिपही देण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप गोडे, मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, आ. समीर मेघे, सागर मेघे, कुलसचिव डॉ. राजीव बोरले तसेच विविध वैद्यकीय शाखांचे अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. अशोक पखान, डॉ. श्याम भूतडा, डॉ.एस.एस. पटेल, प्राचार्य बी.डी. कुलकर्णी, ललिता वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवर विराजमान होते.
दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजीव बोरले यांनी पदवीदान समारंभाची सुरुवात करून कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांनी वैद्यकीय तसेच विविध शाखेत पदवी घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पदवी देण्याची विनंती कुलपती दत्ता मेघे यांना केली. वैद्यकीय शाखेसह सर्व शाखातील अधिष्ठातांनी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सादर करून विधिवत पदवीदान समारंभ संपन्न झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वैद्यकीय शाखेतील आचार्य पदवी प्रदान केलेल्या डॉ. स्वानंद श्रीकांत पाठक, डॉ. श्रद्धा समशेरसिंग भूल्लर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच विशेष प्रावीण्य मिळविलेल्या व सर्वाधिक पदके पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
पदवीदान समारंभाची सांगता डॉ. प्रियंका निरंजने यांच्या पसायदानाने व राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. समर्थ शुक्ला व डॉ. श्वेता पिसुळकर यांनी केले. यावेळी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हा पारिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे, शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर तसेच लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
डॉक्टरांनी ग्रामीण भागात सेवा देण्याची आवश्यकता - मुख्यमंत्री
सेवाभावनेतून सर्वसामान्य जनतेला विशेषत: ग्रामीण भागात युवकांनी सेवा देण्याची आवश्यकता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी व्यक्त केली. समाजाप्रती आपले कर्तव्याची भावना ठेवल्यास आयुष्यातील किमान दोन वर्ष ग्रामीण भागात आरोग्यसेवा देतानाच तेथील आव्हानांचा स्वीकार करा. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. कोल्हे, डॉ. अभय बंग यांनी आपले जीवन समाजासाठी अर्पण केले असून या क्षेत्रातील युवकांनीही त्यांचा आदर्श तसेच स्वामी विवेकानंद यांच्या संदेशातून आपले ध्येय ठरवून पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.