ढोबळमानाने शेतकऱ्यांना मदतीची मागणी
By Admin | Updated: March 29, 2017 00:58 IST2017-03-29T00:58:52+5:302017-03-29T00:58:52+5:30
तालुक्यात लागोपाठ झालेल्या सात शेतकरी आत्महत्या कर्जाच्या व पिकाच्या कारणामुळेच झाल्या हे सत्य आहे.

ढोबळमानाने शेतकऱ्यांना मदतीची मागणी
आष्टी(श.) : तालुक्यात लागोपाठ झालेल्या सात शेतकरी आत्महत्या कर्जाच्या व पिकाच्या कारणामुळेच झाल्या हे सत्य आहे. पण शासकीय अधिकारी वास्तव मानायला तयार नाही. केवळ कागदी घोडे नाचवून वेळकाढू धोरणाचा स्वीकार होताना दिसत आहे. आत्महत्या झाल्याचे बोलके वास्तव पोलीस पंचनामा झाल्यावर समोर येते.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत देणे शक्य आहे अथवा नाही, त्याची आत्महत्या निकशात बसते अथवा नाही, याचा निर्णय घेण्याकरिता जिल्हाधिकारी, विविध अधिकारी व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी या सर्वांची कमिटी त्यावर विचार करते. यामध्ये कागदी घोडे बरोबर नसल्याचे कारण पुढे करून मंजूर प्रकरण नामंजूर केल्या जाते. घरच्या कर्त्याने आत्महत्या केल्यावर जीवंत राहिलेली घरातील माणसे काळजीने मरणाच्या घटका मोजतात. ही सगळी वस्तुस्थिती शासनाने स्वीकारावी अशी समाजाकडून अपेक्षा असते. शासनाकडून मदतीची अपेक्षा असते. प्रत्यक्ष अनुभवानुरूप येथे अपेक्षांचा भंग होत असल्याचे दिसते. गत अनेक वर्षांपासून कर्जाच्या विळख्यात भरडल्या जात असलेला शेतकरी आशेवर जीवन जगत आहे. दरवर्षी पीक लागवडीचा खर्च व अत्यल्प उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्धार करतो. शेतकरी आत्महत्या झाल्यावर कुटुंबाचे सांत्वन करायला अधिकारी तथा लोकप्रतिनिधी यांची उदासीनता दिसून येते. सामाजिक दायीत्व जोपासण्याचा निर्धार कुणीही स्विकारत नाही. शेतकऱ्यांसाठी शासनाने ढोबळमानाने मदत करायची मागणी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाला याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)