ग्रा.पं. संगणक परिचालकांचा तिढा कायम
By Admin | Updated: December 20, 2014 02:00 IST2014-12-20T02:00:48+5:302014-12-20T02:00:48+5:30
ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा त्यांच्या वेतनासह इतरही मागण्यांकरिता गेल्या दोन महिन्यांपासून लाक्षणिक संप सुरू आहे.

ग्रा.पं. संगणक परिचालकांचा तिढा कायम
वर्धा : ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा त्यांच्या वेतनासह इतरही मागण्यांकरिता गेल्या दोन महिन्यांपासून लाक्षणिक संप सुरू आहे. या मागण्यांचा निपटारा व्हावा म्हणून शासनाला अनेकदा निवेदने दिली; पण शासन वा प्रशासनाने संगणक परिचालकांचा तिढा अद्यापपर्यंत सोडविलेला नाही.
यामुळे गत दोन महिन्यांपासून या परिचालकांच्या डोक्यावर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. आज ना उद्या सरकार आमचे प्रश्न सोडवतील व परत कामावर जाऊ, या प्रतिक्षेत हे संगणक परिचालक आहेत. शासनाने प्रत्येक ग्रा.पं.ला संगणकीकृत केले असून ग्रा.पं.ची सर्व कामे संगणकाद्वारे केली जात आहे. या कामाकरिता शासनाला प्रशिक्षित संगणक परिचालकाची गरज असल्याने प्रत्येक ग्रा़पं़ मध्ये संगणक चालकाची नियुक्ती करण्याकरिता एका कपंनीसोबत करार करण्यात आला होता. त्या कंपनीने विशिष्ठ मानधनावर राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांची नियुक्ती केली़ सुरूवातीपासून या कंपनीने संगणक परिचालकांचे आर्थिक शोषण करण्याचे काम सुरू केले.
याविरोधात परिचालकांनी आवाज उठवत गेल्या दोन महिन्यापासून काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे. आर्थिक कोंडमारा होत असून बेरोजगारीमुळे नैराश्येच्या गर्तेत हे संगणक परिचालक आहे. यापैकी अनेक संगणक परिचालकावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असून दोन महिन्यांपासून त्यांचे पगार झालेले नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. याकडे शासन तसेच संबंधित विभागाने या संगणक परिचालकाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी त्यांची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)