Government seized Thirteen mining sites of Yelakeli | येळाकेळी येथील १३ खाणपट्टे शासनजमा

येळाकेळी येथील १३ खाणपट्टे शासनजमा

ठळक मुद्देमहसूल विभागाची कारवाई : १३ क्रशर मशीनसह २ हजार ब्रास गिट्टी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रशासनाकडून येळाकेळी येथील खाणपट्टेधारकांना वारंवार नोटीस बजावूनही खाणपट्टे शासन जमा न करता अवैध उत्खनन सुरूच ठेवले. त्यामुळे गुरुवारी महसूल विभागाने कारवाई करीत १३ खाणपट्टे शासन जमा केले. तसेच १३ क्रशर मशीनसह २ हजार ब्रास गिट्टी जप्त करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या कारवाईमुळे खाणपट्टे मालकांचे धाबे दणाणले आहे.
सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील टेकडीवर मोठ्या प्रमाणात खाणपट्टे असून तेथे अवैधरीत्या गौणखनिज उत्खनन सुरू होते. येथील १३ खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्ये संपली होती. शासनाच्या नवीन धोरणानुसार या खाणपट्टयांचे नूतनीकरण करणे शक्य नसल्याने नव्याने लिलाव करण्याकरिता सर्व खाणपट्टे शासन जमा करण्याचे निर्देश खाणपट्टे मालकांना देण्यात आले होते. याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अवैधपणे उत्खनन सुरूच ठेवले. दरम्यानच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून नोटीसही बजावण्यात आल्या पण; त्यालाही खाणपट्टे मालकांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे गुरुवारी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या नेतृत्वात वर्धा व सेलू येथील तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या उपस्थितीत येळाकेळी येथे कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान तेराही खाणपट्ट्यांचा ताबा घेण्यात आला. तसेच गिट्टी क्रशरच्या १२ मशीन आणि दोन हजार ब्रास गिट्टी जप्त करण्यात आली. सर्व विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला. या कारवाईत सेलू येथील तहसीलदार महेंद्र सोनवणे, वर्ध्याच्या तहसीलदार प्रीती डुडुलकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख व महावितरणचे अभियंता उपस्थित होते.

खाणपट्टे मालकांकडून केली जाणार दंडवसुली
येळाकेळी येथील खाणपट्ट्यांची मुदत २०१७-१८ मध्येच संपल्याने नूतनूकरण केले नसतानाही मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या उत्खनन सुरु होते. त्यामुळे आता महसूल विभागाकडून मुदत संपल्यापासून किती उत्खनन केले याबाबत इटीएसद्वारे मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर जितके ब्रास अवैध उत्खनन केले तेवढा दंडही या खाणपट्टे मालकांकडून वसूल केल्या जाणार आहे. त्यामुळे आता या कारवाईने खदान मालकांना चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे.

येळाकेळी येथील १३ क्रशर मशीनसह २ हजार ब्रास गिट्टी जप्त करण्यात आली आहे. मशिनीला सिल करीत जप्त केलेल्या गिट्टीच्या सभोवताल चुन्याने आखणी केली आहे. येथील गिट्टीची उचल किंवा मशिनचे सिल काढण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल केला जाईल. तसेच त्याला काळ्या यादीत टाकून पुन्हा खाणव्यवसाय करता येणार नाही.
सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.

Web Title: Government seized Thirteen mining sites of Yelakeli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.