३०-५४ चा निधी शासनाने गोठविला
By Admin | Updated: February 2, 2015 23:10 IST2015-02-02T23:10:19+5:302015-02-02T23:10:19+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात विविध विकासकामांचे २४ कोटी रुपयांची देयके गत पाच महिन्यांपासून धुळखात आहे. शासनाने ३०-५४ या हेडचा निधी गोठविल्याने विकासकामे ठप्प झाली आहे.

३०-५४ चा निधी शासनाने गोठविला
कंत्राटदार कर्जबाजारी : २४ कोटींची देयके धूळ खात
अमोल सोटे - आष्टी (शहीद)
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात विविध विकासकामांचे २४ कोटी रुपयांची देयके गत पाच महिन्यांपासून धुळखात आहे. शासनाने ३०-५४ या हेडचा निधी गोठविल्याने विकासकामे ठप्प झाली आहे. यामुळे कंत्राटदार कर्जबाजारी झाले आहेत.
आष्टी तालुक्यात तळेगाव-आष्टी, आष्टी-साहुर, नांदपूर - चिस्तुर-खडकी, खडकी- खंबीत बेलोरा रस्त्यावरील कामासाठी ३०-५४ अंतर्गत साडेआठ कोटींची कामे मंजूर झाली होती. यातील पाच कोटींची कामे पूर्ण झाली तर साडेतीन कोटींची कामे निधीअभावी रखडली आहे. कंत्राटदारांनी लाखो रुपये उसणवारीने घेऊन कामे केली. डांबर कंपन्यांकडून उधार आणले; मात्र वेळेवर केलेल्या कामाचे दाम मिळत नसल्यामुळे उर्वरीत कामे कशी करावी असे संकट कंत्राटदारांसमोर आले आहे. हिच स्थिती जिल्ह्याची आहे. याच हेडवरील एकूण ६० कोटींची कामे मंजूर आहे. त्यापैकी २४ कोटींची देयके गत पाच महिन्यांपासून धूळ खात आहे. कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंत्याकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविला; मात्र शासनाचा भोंगळ कारभार येथे आडवा येत आहे. शासनाने तत्काळ ३०-५४ हेडचा निधी देऊन रखडलेली कामे मार्गी लावावी आणि कंत्राटदारांना हक्काचे दाम देवून समस्या मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.