शासन आणि समाज यात एक सुदृढ नाते हवे- विनायक देशपांडे
By Admin | Updated: January 12, 2016 01:49 IST2016-01-12T01:49:03+5:302016-01-12T01:49:03+5:30
शासन व समाज हे परस्पर पूरक असतात. राष्ट्राला विकासपथावर न्यावयाचे असेल तर शासन आणि समाज यामध्ये एक सुदृढ नाते असणे आवश्यक आहे.

शासन आणि समाज यात एक सुदृढ नाते हवे- विनायक देशपांडे
कमलनयन बजाज परिसंवाद स्पर्धा : अमरावतीचा अनिरूद्ध महाजन प्रथम
वर्धा : शासन व समाज हे परस्पर पूरक असतात. राष्ट्राला विकासपथावर न्यावयाचे असेल तर शासन आणि समाज यामध्ये एक सुदृढ नाते असणे आवश्यक आहे. समाज सतत जागरूक असावयास हवा. त्याकरिता सुशिक्षितांचा त्यात सहभाग वाढणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूरचे माजी कार्यकारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी केले.
शिक्षा मंडल, वर्धा द्वारा आयोजित ४२ व्यास कमलनयन बजाज स्मृती आंतरविद्यापीठ परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अतिथी म्हणून ते बोलत होेते. यावेळी विचार व्यक्त करताना डॉ. देशपांडे म्हणाले, ‘शासन आणि समाज’ यामध्ये दरी वाढताना दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वाढणारे खाजगीकरण हे होय. आधुनिक समाजात माणसापेक्षा पैशाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. यामुळे इकॉनॉमिक्स बरोबरच इगोनॉमिक्सही वाढलेले दिसते. शासन व समाज यामधील दरी दूर करण्यात शिक्षण क्षेत्र महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते.
परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात जा.ब. विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांच्या चमूने सादर केलेल्या समारोप गीताने झाली. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षा मंडल, वर्धाचे उपाध्यक्ष भरत महोदय, सभापती संजय भार्गव, सहसचिव पुरूषोत्तम खेमुका, परीक्षक डॉ. अनिल ढगे, डॉ. अन्वर सिद्दीकी व परिसंवादाचे समन्वयक डॉ. शेषराव बावनकर उपस्थित होते.
यावेळी संजय भार्गव यांच्यासह या स्पर्धेचे परीक्षक डॉ. अनिल ढगे व डॉ. अन्वर सिद्दिकी यांनीही विचार व्यक्त केले. संचालन प्राचार्य डॉ. ओम महोदय यांनी केले तर आभार डॉ. शेषराव बावनकर यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षा मंडलचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी तथा शहरातील गणमान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.(प्रतिनिधी)